अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा
By हरी मोकाशे | Published: September 1, 2022 05:35 PM2022-09-01T17:35:43+5:302022-09-01T17:36:28+5:30
मांजरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन देवणी (खु.) येथे एका ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
देवणी (जि. लातूर) : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर देवणी पोलिसांनी पकडून तो जप्त केला. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले, मांजरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन देवणी (खु.) येथे एका ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ५ लाख रुपये असून वाळूची किंमत ५ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संजय बोरसे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी नदीम सत्तार पठाण (रा. येणगेवाडी) व ज्ञानेश्वर माधव पाटील (रा. देवणी खु.) या दोघांविरुद्ध देवणी पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. विनायक कांबळे करीत आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बोरोळ येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही महिन्यांपासून अवैध वाळू उपसा वाढला आहे. शासकीय कार्यालयाला सुट्टी असलेल्या दिवशीच्या रात्री अवैधरित्या वाळू साठा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करुन विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे.