वाहतुकीवर ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’आता करणार नागरिकांचे प्रबोधन!
By राजकुमार जोंधळे | Published: June 3, 2023 09:18 PM2023-06-03T21:18:02+5:302023-06-03T21:18:36+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता काय कारवाई होईल, त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे.
लातूर : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’ पुढाकार घेणार आहेत. समाजातील विविध घटकांना, साेसायट्यांतील वाहनधारक, नागरिकांचे प्रबेधान केले जाणार आहे. यासाठी लातूर पाेलिस दलाच्या वतीने ‘ट्रॅफिक ॲम्बॅसिडर’ला कायदा, वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता काय कारवाई होईल, त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. लातुरात राबविण्यात येणारा हा ‘अभिनव उपक्रम’ राज्यातील पहिलाच ठरणार आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवेर यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम राबविला जात आहे.
अतिशय नावीन्यपूर्ण वाटणाऱ्या उपक्रमाला सुजाण लातूरकर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. सध्या ऑनलाइन नोंदणीचा आकडा शंभरावर पोहोचला आहे. या ट्रॅफिक ॲम्बॅसिडरला वाहतूक शाखेच्या वतीने पांढरा टी-शर्ट आणि टोपी दिली जाणार आहे. आठवड्यातील जमेल तेवढा वेळ त्यांनी लातुरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, वाहनधारकांचे प्रबोधन, जागृती करण्यासाठी द्यायचा आहे.
अनेकांनी नोंदवले ऑनलाइन नाव...
लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोर्टलवर होशी नागरिकांना आपली नावे नोंदविता येणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्याकडे आठवड्यात असलेला उपलब्ध वेळ नोंद करायचा आहे. त्यांना त्या-त्या वेळेत शहरातील रस्ते, चौक, सोसायट्या आणि गल्लोगल्लीतील नागरिकांत जनजागृती करायची आहे.
कायद्याबरोबरच वाहतूक नियमांचे मिळणार प्रशिक्षण...
‘लातूर पोलिस पोर्टल’वर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना एकत्रितपणे किमान आठवडाभराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कायद्याबराेबरच वाहतुकीच्या नियम याबाबत तज्ज्ञ पोलिस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षित झाल्यानंतर हे ॲम्बॅसडर लातूरकरांचे, वाहनधारकांचे वाहतुकीबाबत प्रबोधन करणार आहेत.
- गणेश कदम, पोलिस निरीक्षक, लातूर