३ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वाहतूक शाखा ॲक्टिव्ह मोडवर; पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख वसूल
By आशपाक पठाण | Published: June 19, 2023 05:50 PM2023-06-19T17:50:03+5:302023-06-19T17:51:33+5:30
मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे.
लातूर : वाहतूक कोंडी रोखण्याचे काम करणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पथकाने वसुलीवरही विशेष भर दिला आहे. मागील पाच महिन्यांत विविध दंडाची थकबाकी असलेली वाहने टार्गेट करून तपासणी केली जात आहे. त्यानुसार पाच महिन्यांत एक दोन नव्हे तर तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची वसुली लातूर शहर वाहतूक शाखेने केली आहे. मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे. एकदा ऑनलाइन दंड नावावर पडला की, पुन्हा शहरात यायचे नाही किंवा दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करायची. हजारो वाहनधारकांकडे थकीत असलेली रक्कम कोट्यवधींची आहे. एकदा खटला दिला की, एक तर तो निकाली काढावा लागतो किंवा दंडाची रक्कम वसुली करावी लागते. यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेच्या पथकाकडून वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच दंडात्मक कारवाईवर भर दिला जात आहे. वाहतूक शाखेच्या विशेष पथकाकडून वाहन तपासणीत थकीत दंड असलेल्या वाहनांकडून सक्तीचे वसुली केली जात असल्याचे सांगण्यात आले.
दंड कशाचा, कधी भरायचा...
वाहन परवाना नाही, फिटनेस, पीयूसी, इन्सुरन्स, सिग्नल तोडले आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख १६ हजार वाहनधारकांना ऑनलाइन दंड देण्यात आला आहे. यात दररोज शहरात येणारी किंवा व्यावसायिक वाहने दंडाची रक्कम भरून घेतात. दंड भरण्यात दुचाकीचालक दुर्लक्ष करतात. दीड वर्षात तब्बल ३ कोटींची दंडाची रक्कम वसूल होणे बाकी आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पथकाकडून वाहन तपासणीत थकबाकी आढळून आलेली वाहने शोधली जात आहेत.
ई-चलन मशीनचा वापर...
लातूर शहर वाहतूक शाखेच्या पथकाकडून ई- चलन मशीनद्वारे वाहनाचा क्रमांक टाकून त्याची माहिती काढली जात आहे. दंडाची रक्कम थकीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याकडून वसुली केली जात आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोलिस उपनिरीक्षक आवेज काझी, पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या पथकाने पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपयांची थकीत दंडाची रक्कम वसूल केली आहे.
विस्कळीत वाहतुकीकडेही लक्ष हवे...
लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, गंजगोलाई, बार्शी रोडवर पाच नंबर चौक याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची आहे. सकाळी व सायंकाळी किमान तीन ते चार तास याठिकाणी वाहतूक पोलिस तत्पर असायला हवेत. तेही प्रत्येक चौकात किमान ४ तरी पोलिस हवेत. त्याशिवाय कोंडी हटणार नाही. वसुलीबरोबर सुरळीत वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.