लातूरातील सिग्नल बनले शोभेच्या वस्तू! १८ पैकी आठचा तर वापरच नाही, उरलेले पडतात बंद
By हणमंत गायकवाड | Published: May 29, 2024 11:31 AM2024-05-29T11:31:10+5:302024-05-29T11:31:29+5:30
विशेष म्हणजे चालू असणारे सिग्नल अधूनमधून बंद असतात.
लातूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी. चौकांमधील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या अंतर्गत १८ ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत; मात्र यातील आठ सिग्नलचा वापरच नाही. त्यामुळे या निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. विशेष म्हणजे चालू असणारे सिग्नल अधूनमधून बंद असतात. वाहतूक शाखेच्या मनावर ते कधी चालू, तर कधी बंद राहतात. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते. अनेकदा सिग्नल बंद असल्याचे समजून वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन यामुळे होते आहे.
महानगरपालिकेकडे सिग्नलची देखभाल-दुरुस्ती आहे. त्यानुसार लातूर शहरात १८ ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू असतात. या वेळेत वाहतूक शाखेचे पोलिस चौकात असतात; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून वापरात नसलेले सिग्नल बंद आहेत. त्यात विवेकानंद चौक, शाहू चौक, सुभाष चौक, नंदी स्टॉप, खर्डेकर स्टॉप, आदर्श कॉलनी येथील सिग्नलचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातीलही व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून सिग्नल बंद करण्यात आले आहे. नेहमीच सिग्नल बंद असते म्हणून अनेकदा वाहनधारक सिग्नल चालू असताना आणि सिग्नल पडल्यानंतर नियमाचे उल्लंघन करतात. याला कारण म्हणजे वारंवार सिग्नल बंद असणे हे आहे.
वापरातील सिग्नल अनेकदा राहतात बंद...
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे गूळ मार्केट, गांधी चौक, मिनी मार्केट, अशोक हॉटेल, दयानंद गेट या ठिकाणचे सिग्नल अनेकदा बंद असतात.
सोमवारी प्रस्तुत ठिकाणचे सिग्नल दिवसभर बंद होते. संविधान चौकातील सिग्नल बराच काळ बंद होते. याबाबत महानगरपालिकेशी संपर्क साधला असता त्यांनी वापरात नसलेले ८ सिग्नल बंद आहेत.
उर्वरित दहा सिग्नल सुरू असल्याचे सांगण्यात आले. देखभाल-दुरुस्ती मनपाकडे असून हाताळण्याची जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांकडे आहे.
वापर नसल्यामुळे काही सिग्नल आहेत बंद
दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने कंत्राट दिले होते. ते कंत्राट संपल्यामुळे काही सिग्नलची दुरुस्ती राहिली आहे. शिवाय, वापर नसल्यामुळे आठ सिग्नल बंद आहेत. उर्वरित सगळे चालू आहेत. त्यामुळे वाहतुकीला काही अडथळा नाही. सिग्नल व्यवस्था व्यवस्थित आहे. ही व्यवस्था पोलिस वाहतूक शाखेकडून हाताळली जाते. - गणेश कदम, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा