चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; दाेघांविरुद्ध गुन्हा, निलंगा महसूल विभागाची कारवाई...
By राजकुमार जोंधळे | Published: May 22, 2024 09:45 PM2024-05-22T21:45:22+5:302024-05-22T21:45:29+5:30
कर्नाटकची वाळू महाराष्ट्रात दाखल...
राजकुमार जाेंधळे / निलंगा (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्यांविराेधात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी आणि कासार शिरसी पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निलंगा येथील महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी केली.
निलंगा तालुक्यात अलिकडे माेठ्या प्रमाणावर अवैध वाळूची वाहतूक, साठेबाजी करण्यात येत असून, याविरुद्ध तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांविराेधात कारवाई करण्यासाठी विविध पथके स्थापन केली आहेत. त्यांच्याकडून उत्खनन, चाेरट्या मार्गाने हाेणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यात येत आहे. होसूर-चिचोंडी मार्गावर खंडू उत्तम शामगीरे हा ट्रॅक्टरमधून वाळुची वाहतूक करत हाेता. ट्रॅक्टरची होसूर येथील तलाठी राजू कांबळे यांनी चाैकशी केली असता, ट्रॅक्टरमधून अवैध वाळूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांनी हे ट्रॅक्टर निलंगा तहसिल कार्यालयात थांबविण्यास सांगितले. यावेळी ट्रॅक्टर मालक खंडू शामगीरे याने तलाठ्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावरच टाकून पळून गेला. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.
कर्नाटकची वाळू महाराष्ट्रात दाखल...
कर्नाटकातून वाळूची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे अवैध वाळू असलेल्या टिप्परची पथकाने चौकशी केली. यावेळभ चालक सिध्दू नागया स्वामी (रा. बसवकल्याण जि. बीदर) याच्याकडे वाळूबाबत कुठलाही परवाना आढळून आला नाही. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.