१५ हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता जाळ्यात; एसीबीचा सापळा, अहमदपूरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: March 31, 2024 11:47 PM2024-03-31T23:47:15+5:302024-03-31T23:47:20+5:30
१५ हजाराच्या लाचेची रक्कम बळीराम साेनकांबळे याने कार्यालयात स्वतः स्वीकारली
लातूर : अहमदपूर येथील जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत लघू पाटबंधारे ग्रामीण पुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता १५ हजाराची लाच स्वीकारताना रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील पार येथे १५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत लघू पाटबंधारे ग्रामीण पाणीपुरवठ्याअंतर्गत प्राप्त निधीतून पाइपलाइन, नळ जोडणीचे काम करण्यात आले आहे. या कामाचे बिल काढण्यासाठी बळीराम पंढरीनाथ सोनकांबळे (वय ५३) याने प्रथम ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यातील १५ हजार रुपये आता द्या आणि उर्वरित १५ हजार काम झाल्यानंतर स्वीकारण्याचे पंचांसमोर मान्य केले.
दरम्यान, १५ हजाराच्या लाचेची रक्कम बळीराम साेनकांबळे याने कार्यालयात स्वतः स्वीकारली. यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले, तर सहायक पंडित मच्छिंद्र शेकडे (वय ३९) याने लाच देण्यास प्रोत्साहन दिले. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर करत आहेत.
ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे पोलिस उपाधीक्षक संतोष बर्गे, पोलिस कर्मचारी फारूक दामटे, भागवत कठारे, श्याम गिरी, शिवशंकर कच्छवे, रूपाली भोसले, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने केली.