ट्रॅव्हल्स-ट्रॅक्टर अपघातात दोन ठार; २५ जखमी! शिरूर ताजबंद-मुखेड राज्य मार्गावरील घटना

By आशपाक पठाण | Published: March 23, 2023 10:57 PM2023-03-23T22:57:29+5:302023-03-23T22:57:45+5:30

शिरूर ताजबंद ते मुखेड राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स (क्र. एनएल ०१ बी१८९३) आणि ट्रॅक्टरच्या अपघातात दोघेजण ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत.

Travels-tractor accident kills two; 25 injured! Incident on Shirur Tajband-Mukhed State Highway | ट्रॅव्हल्स-ट्रॅक्टर अपघातात दोन ठार; २५ जखमी! शिरूर ताजबंद-मुखेड राज्य मार्गावरील घटना

ट्रॅव्हल्स-ट्रॅक्टर अपघातात दोन ठार; २५ जखमी! शिरूर ताजबंद-मुखेड राज्य मार्गावरील घटना

googlenewsNext

जळकोट (जि. लातूर) :

शिरूर ताजबंद ते मुखेड राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स (क्र. एनएल ०१ बी१८९३) आणि ट्रॅक्टरच्या अपघातात दोघेजण ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. ही घटना जळकोट तालुक्यातील उमरगा गावानजीक गुरुवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना अहमदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ट्रॅव्हल्समधील निवृत्ती गणपती नरवटे (वय ४५, रा. कोळनूर, ता. जळकोट) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पार्थवी विष्णुदास नरवटे या सहा महिन्याच्या चिमुकलीचा अहमदपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींना अहमदपूर, हाडोळती, जांब, मुखेड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या लक्ष्मी विष्णुदास नरवटे, शिवहार आनंदराव फुगेवाड (रा. कोळनूर, ता. जळकोट), यशोदाबाई नामदेव शंकपाळे, नामदेव विठ्ठल शंकपाळे (रा. पोखरणी, ता. कंधार), अनिल बालाजी इंगोले (आलू वडगाव ता.नायगाव) यांच्यावर अहमदपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ट्रॅव्हल्स उलटला...

अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स पलटी झाली. प्रवाशांनी ओरड केल्याने उमरगा गावातील पंडित गीते, अमृत केंद्रे, प्रकाश मुगळे, श्याम ढोबळे, विलास कापसे, अंकुश गीते यांच्यासह वीस ते पंचवीस तरुणांनी ट्रॅव्हल्सकडे धाव घेतली. तत्काळ जखमींना बाहेर काढले. जि.प.चे माजी सदस्य बाबूराव जाधव व पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, उपनिरीक्षक मुस्तफा फरकोटे, चिमनदरे यांनी रुग्णवाहिका तसेच मिळेल त्या वाहनाने जखमींना रुग्णालयात पाठविले. अहमदपूर येथे आठजणांवर उपचार करण्यात आले असून गंभीर असलेल्या काहीजणांना लातूरला पाठविले आहे.

अर्धा तास वाहतूक ठप्प...

अपघातानंतर जवळपास अर्धा तास राज्यमार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळकोट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी सांगितले, अपघातानंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Web Title: Travels-tractor accident kills two; 25 injured! Incident on Shirur Tajband-Mukhed State Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात