लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव

By हरी मोकाशे | Published: August 30, 2022 01:45 PM2022-08-30T13:45:43+5:302022-08-30T13:46:00+5:30

यंदाच्या गणेशोत्सवात लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन

Tree planting competition at this year's Ganesh festival in Latur; The winning Ganesha mandals will be celebrated | लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव

लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव

googlenewsNext

लातूर : वृक्ष लागवड केवळ शासन, ग्रामपंचायतनेच करणे अपेक्षित नाही. त्यात गावातील प्रत्येक व्यक्ती, संस्था तसेच मंडळांचा सहभाग असावा म्हणून यंदाच्या गणेशोत्सवात जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धा होत आहे. सर्वाधिक वृक्ष लागवड करणाऱ्या मंडळांचा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

यंदाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने ५३.३९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतकडून वृक्ष लागवड केली जात आहे. मोहिमेत सर्वजण सहभागी व्हावे आणि ती लोकचळवळ व्हावी म्हणून यंदा जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याबरोबरच मंडळांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धे अंतर्गत प्रत्येक पंचायत समिती व जिल्हा परिषद गटात सर्वाधिक वृक्ष लागवड करणाऱ्या पहिल्या तीन मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात जी मंडळी सर्वाधिक वृक्ष लागवड करतील अशा पहिल्या तीन मंडळांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी वृक्ष लागवड स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

वनक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न...
जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे. ते वाढवण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवात विविध मंडळाकडून सामाजिक प्रबोधनाचा जागर घालण्यात येतो. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोकचळवळ निर्माण करण्यात गणेश मंडळांची मोलाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे.
- दत्तात्रय गिरी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

Web Title: Tree planting competition at this year's Ganesh festival in Latur; The winning Ganesha mandals will be celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.