औस्यात मराठा आरक्षणासाठी सरकारला वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:31 PM2018-07-21T17:31:40+5:302018-07-21T17:32:48+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा व समाज बांधवाच्या वतीने औसा टी- पॉर्इंट येथे आज सकाळी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
औसा ( लातूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा व समाज बांधवाच्या वतीने औसा टी- पॉर्इंट येथे आज सकाळी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या़.यासोबतच संतप्त आंदोलकांनी सरकार आणि मराठा समाजाच्या आमदारांना श्रद्धांजली वाहिली.
आज मराठा समाज बांधव दारिद्र्यात जीवन जगत असून हा समाज सर्व क्षेत्रात मागे पडला आहे़ समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण मिळाले पाहिजे़ आरक्षणाचा न्याय जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरुच राहील़ परळीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हा रास्तारोको करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले़
औसा टी- पॉर्इंट येथे सकाळी ११ वा़ हे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनामुळे लातूर- सोलापूर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती़ त्यामुळे दोन्ही बाजूंनी दोन- दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता़ आंदोलनानंतर नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
या आंदोलनात सुरेश भुरे, गोपाळ धानुरे, आकाश पाटील, नागेश मुगळे, भरत सूर्यवंशी, संजय कदम, विष्णू माडजे, राजेंद्र मोरे, धर्मराज पवार, संजय उजळंबे, विलास लंगर, अविनाश पवार, रामराम जंगाले, नितीन सांळुके, वैभव बोडके, भैरवनाथ माळी, चंद्रकांत माने, खंडू जाधव, पुरुषोत्तम नलगे, गोविंद खंडाळगे, सदानंद भोसले, शशिकांत माने, आत्माराम साळुंके, निलेश बोरफळे यांच्या अनेक समाज बांधव सहभागी झाले होते़
सरकारला वाहिली श्रध्दांजली
औसा टी- पॉर्इंट येथील आंदोलनादरम्यान, सरकार व मराठा समाजाच्या १४५ आमदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली़ परळीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला़ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या़ आमच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे़ समाजाचे आमदार मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या़