किल्लारी भूकंपातील मृतात्म्यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:32 PM2020-09-30T16:32:08+5:302020-09-30T16:33:57+5:30
बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
किल्लारी : ३० सप्टेंबर ही तारीख आजही किल्लारीकरांसह अवघ्या महाराष्ट्रालाच थेट १९९३ सालात घेऊन जाते आणि हजारो नागरिकांचे प्राण घेणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी जाग्या होतात. त्यामुळेच बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
यावेळी तहसीलदार शोभा पुजारी, आ. अभिमन्यू पवार, सरपंच शैला लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप लोहार, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रेवाड, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
२७ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात या परिसरातील हजारो नागरिकांचा जीव गेला. परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी किल्लारी गावात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.
पुनर्वसनात अनेकांना घरे मिळाली. परंतु, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने घराची गरज निर्माण होत आहे. यासह येथील नागरिकांसमोर सध्या अनेक नागरी प्रश्न असून या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
ज्यांनी या भुकंपात आपल्या आप्तांना गमवले होते, त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी दाटून आले आणि त्यांच्या आठवणींनी मन उचंबळून आले. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.