बस तिकिटांचा ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!
By राजकुमार जोंधळे | Published: June 17, 2023 06:26 PM2023-06-17T18:26:06+5:302023-06-17T18:32:52+5:30
उदगीर येथील न्यायालयाचा निकाल, पाेलिसांनी नाेंदविल्या ५० साक्षीदारांच्या साक्ष
उदगीर (जि. लातूर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उदगीर आगारात २०१२ मध्ये झालेल्या ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपींची उदगीर येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी जे.सी. गुप्ता यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
उदगीर आगारात २०१२ मध्ये आरोपी अनिल मरेवाड यांनी ३ हजार ३९८ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तत्कालीन आगारप्रमुख धरणी कांडगिरे यांनी उदगीर शहर पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी अनिल मरेवाड यांनी ८,१४, ९७८ रुपयांचा, वाहक राहुल धनाश्री यांनी ६,९१,०१४ रुपये, नरेंद्र गौडा याने १४,६९८ रुपये, अनिल फुले यांनी ५६ हजार ४९९ रुपये, विवेक शिरूर यांनी ५०५३ रुपये, महेश पोलकर यांनी ५६,४४५ रुपयांचा अपहार तिकीट मशीनमध्ये छेडछाड करून केल्याचे उघड झाले. त्याला ट्रायमॅक्स कंपनीचे तज्ज्ञ प्रतिनिधी प्रवीण मस्के आणि अमोल मस्के यांनी मदत केली.
हिशाेबाच्या कागदावर केली हाेती खाडाखाेड...
तत्कालीन राेखपाल मनोज तरोडे यांनी हिशोबाच्या कागदावर खाडाखोड करून वाहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासकीय रकमेचा अपहार केल्याची तक्रार उदगीर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी पुरावा म्हणून संशयित आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप, आरोपींचे बँक पासबुक आदी मुद्देमाल जप्त केला हाेता. त्याचबराेबर अनेकांचे जबाबही नोंदविला हाेता.
पाेलिसांनी नाेंदविल्या ५० साक्षीदारांच्या साक्ष...
या प्रकरणात पोलिसांनी जवळपास ५० जणांना साक्षीदार बनवले होते. या प्रकरणाच्या सुनावणीअंती १६ जून रोजी रोजी उदगीर येथील न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. सचिन वैद्य यांनी, तर आरोपींच्या वतीने ॲड. शिवाजी कोकणे यांनी काम पाहिले.