पीकविमा भरण्यास अडचण; शेतकऱ्यांनी घातला बँक अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 06:19 PM2018-07-21T18:19:45+5:302018-07-21T18:21:41+5:30
आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होत़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला़
लातूर: पीकविमा भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने शेतकरी विमा भरण्यासाठी बँकेत गर्दी करीत आहेत़ परंतु, औसा तालुक्यातील बेलकुंड महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत आठ दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होते त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला़ सोमवारपर्यंत पीकविमा न घेतल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला़
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै अंतिम मुदत आहे़ त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे़ औसा तालुक्यातील बेलकुंड येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून तिथे बेलकुंड व परिसरातील काही गावांतील शेतकरी दरवर्षी पीकविमा भरतात़ तसेच काही शेतकरी आशिव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पीकविमा भरतात़
पीकविमा भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे़ बेलकुंड येथील राष्ट्रीयकृत बँकेत पीकविमा भरण्यासाठी गर्दी होत आहे़ दरम्यान, बँकेतील इंटरनेटसेवा बंद असल्याने काही शेतकरी आशिव येथील जिल्हा बँकेत पीकविमा भरण्यासाठी जात आहेत़ त्यामुळे तिथे मोठी गर्दी होत आहे़
बेलकुंडच्या बँकेतील इंटरनेट सेवा व्यवस्थित चालत नसल्याने तेथील कर्मचारी अन्य ठिकाणहून पीकविमा भरण्याचा सल्ला देत आहेत़ त्यामुळे संतप्त झालेल्या जवळपास शंभर शेतकऱ्यांनी शनिवारी बँकेतील अधिकाऱ्यांना घेराव घातल सोमवारपर्यंत पीकविमा भरुन न घेतल्यास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे़
आठ दिवसांपासून इंटरनेट बंद
बँकेतील इंटरनेट सेवा आठ दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत़ इंटरनेट सेवा सुरळीत होताच पीकविमा भरुन घेतला जाईल, असे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी जगन्नाथ पाटील यांनी सांगितले़
पीकविम्यापासून वंचित राहण्याची भीती़
इंटरनेट सेवा बंद असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देऊन ती सुरळीत करावी़ लवकरात लवकर ही सेवा सुरळीत न झाल्यास अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची भिती आहे़ पीकविमा भरण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे येथील शेतकरी सूरज पाटील यांनी सांगितले़