ट्रक खड्ड्यात; दाेन जण जागीच ठार, एक गंभीर
By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2025 23:39 IST2025-02-14T23:38:06+5:302025-02-14T23:39:02+5:30
लातूर-जहिराबाद महामार्गावर मसलगा पाटी येथील घटना

ट्रक खड्ड्यात; दाेन जण जागीच ठार, एक गंभीर
निलंगा / केळगाव (जि. लातूर) : भरधाव ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ते खड्ड्यात गेले. या अपघातात दाेघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मसलगा पाटीवर शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली.
कर्नाटक राज्यातील ट्रक (के.ए. ३५ सी. ९८४५) खड्ड्यात गेल्याने झालेल्या अपघातात प्रशांत काशीनाथ चिंतामणी (वय २९) आणि अशोक वैजनाथ चिंतामणी (वय ३५, दोघेही रा. काळे गल्ली बस्वकल्याण जि. बिदर) हे जागीच ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला. लातूर-जहिराबाद महामार्गावर मसलगा पाटीवर बस्वकल्याण येथील लातूरकडे सौरऊर्जेचे लोखंडी ॲगल घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटला. यावेळी रस्त्यालगच्या खड्ड्यात ट्रक गेल्याने ट्रकमधील लोखंडी ॲगल कॅबीनवर आदळल्याने केबीनचा चुराडा झाला. या अपघातात केबीनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळी मसलगा ग्रामस्थांनी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने ॲगल बाजूला काढून तिघांनाही बाहेर काढले. यातील गंभीर जखमीला उपचारासाठी पाठविले. घटनास्थळी निलंगा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, सुनील पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.