मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने ‘जलदूत’ जाणार

By admin | Published: April 15, 2016 11:10 PM2016-04-15T23:10:19+5:302016-04-16T00:21:26+5:30

मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा : युध्दपातळीवर काम; दिवसआड २७ लाख लिटर पाणी देणार

From Tuesday onwards, full capacity will be 'Jaldoot' | मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने ‘जलदूत’ जाणार

मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने ‘जलदूत’ जाणार

Next

शरद जाधव -- सांगली --पाणीटंचाईने व्याकूळ झालेल्या लातूरकरांच्या मदतीला धावलेल्या सांगली-मिरजकरांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आता लातूरला अधिक सुलभरित्या पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे. स्वतंत्र जलवाहिनीद्वारे ‘जलदूत’ एक्स्प्रेसच्या वाघिणी भरून एकाचवेळी २७ लाख लिटर पाणी देण्याची क्षमता असलेली योजना दोन दिवसात पूर्ण होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची स्वच्छताही महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी एकावेळी चार यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
कृष्णा नदीपासून मिरजेच्या रेल्वे यार्डापर्यंतचे अंतर सात किलोमीटर आहे. त्यापैकी नदीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेचार किलोमीटरची जलवाहिनी अस्तित्वात आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे यार्ड या उर्वरित २७०० मीटर अंतरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात ३०० मीटर अंतरावर लोखंडी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी १ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना, १२ इंच व्यासाच्या पीव्हीसी पाईप जळगाववरून उपलब्ध न झाल्याने कामात अडथळा आला होता. मात्र, आता त्या उपलब्ध झाल्याने सोमवारी दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रात्रंदिवस यंत्रणा कार्यरत
लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून, या कामावर पाच जेसीबी, वेल्डिंग कामगार आणि इतर असे शंभराहून अधिक कामगार रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर जीवन प्राधिकरण, रेल्वे व महसूल विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे दिवसातून दोनदा भेट देऊन स्वत: कामाची पाहणी करीत आहेत.

एकाचवेळी २५ टँकर भरण्याची सोय
पाणीपुरवठा अधिक सुलभ होण्यासाठी २५ अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकावेळी २५ टॅँकर भरण्याची सोय या नवीन यंत्रणेमुळे होणार असून ५० वाघिणींची गाडी पाठविण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होणार आहे.
या ऐतिहासिक प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पाण्याच्या आणीबाणीचे गांभीर्य ओळखून यंत्रणा काम करत आहे. जलवाहिनीसाठी जळगाववरून मिरजेत सहा मीटर्सच्या ७२ पीव्हीसी पाईप आल्या आहेत. तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचे काम असल्याने विलंब लागत आहे.

५० वाघिणींतून पाणी देण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलशुद्धीकरण केंद्रात क्रॉस कनेक्शनच्या मुख्य जोडणीचे काम पूर्ण झाले. तसेच, कोल्हापूर रेल्वे रुळाखालून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकाचवेळी २५ वाघिणींमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हैदरखान विहीर ते यार्डापर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले असून हे संपूर्ण काम सोमवारपर्यंतपूर्ण होण्याची शक्यता आहे. लातूरला विक्रमी वेळेत पाणी पोहोचले असले तरी, ५० वाघिणींतून पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे व तो येत्या दोन दिवसात पूर्णत्वास येणार आहे.

लातूरला पाणी देण्यात सांगलीकरांनी दाखविलेले दातृत्व अभिमानास्पद आहे. केवळ पाच दिवसांच्या नियोजनातून लातूरला पाणी देण्यात यश आल्याने, आता पूर्ण क्षमतेने ५० वाघिणींच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन पूर्णत्वास येत आहे. सोमवारपर्यंत काम पूर्ण झाल्यास मंगळवारपासून लातूरला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात कोणतीही अडचण नाही. - मकरंद देशपांडे, योजनेचे प्रणेते

Web Title: From Tuesday onwards, full capacity will be 'Jaldoot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.