तुळजापूरच्या महिलेवर अत्याचार; शिक्षकाला दाेन दिवसांची काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: September 22, 2024 09:06 PM2024-09-22T21:06:15+5:302024-09-22T21:06:43+5:30
सहा महिन्यांपासून पीडितेसाेबत सुरू हाेती चॅटिंग...
राजकुमार जाेंधळे / लातूर : तुळजापूरच्या एका ३० वर्षीय महिलेवर लातुरात लाॅजवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील शिक्षकाला लातूर न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. गुन्ह्यातील अन्य तिघा अनाेळखींचा पाेलिसांकडून शाेध घेतला जात आहे.
पाेलिसांनी सांगितले, साेशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक विठ्ठल रामराव हुगेवाड (रा. नांदेड, ह.मु. लातूर) याची झालेली ओळख...त्यानंतर सुरू असलेली चॅटिंग, व्हिडिओ काॅलिंगचा सिलसिला. यातून ही ओळख घट्ट झाली. शिर्डीच्या मेळाव्यावरून लातुरात येणाऱ्या शिक्षक हुगेवाड यास तुळजापूरच्या पीडित महिलेने काॅल केला. तुम्ही तुळजापूरला या...असे सांगितले. त्यावर शिक्षकाने सांगितले, मी शिर्डीहून आलाे आहे. तर मीच लातुरात येते. असे सांगत पीडित महिला लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चाैकात १६ सप्टेंबर राेजी दुपारी आली. तेथे शिक्षक हुगेवाड याच्यासह अन्य तिघे कारसह थांबले हाेते. पीडित महिला कारमध्ये बसल्यावर कार नांदेड राेडवर काेळपा येथील एका लाॅजकडे गेली. रस्त्यालगत कार थांबली आणि इतर दाेघांनी अत्याचार केला, असे पीडितेने म्हटले आहे. त्यानंतर आराेपी शिक्षकाने लाॅजवर नेत अत्याचार केला. यातील शिक्षक विठ्ठल हुगेवाड याला अटक केली आहे. लातूर न्यायालयात त्यास हजर केले असता दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
बारा मिनिटामध्ये
लाॅजवर पाेहोचली कार...
छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पीडित महिलेला कारमध्ये बसवून ही कार काेळपा येथील एका लाॅजसमाेर पाेहोचली. हे अंतर केवळ १२ मिनिटांचे आहे. दरम्यान, लाॅजसमाेर पाेहोचल्यानंतर इतर दाेघांनी विनयभंग करुन अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.
तुळजापूर, तामलवाडी
येथेही असे गुन्हे दाखल?
धाराशिव जिल्ह्यात पीडित महिलेकडून अशा स्वरुपाचे काही गुन्हे दाखल आहेत का? याचीही माहिती रविवारी घेतली असता, तुळजापूर आणि तामलवाडी पाेलिस ठाण्यात अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे. याबाबत अधिक चाैकशी केली जात असून, या गुन्ह्यांचीही पडताळणी केली जात आहे. - पाेनि. एस. ए. पाटील, विवेकानंद चाैक ठाणे, लातूर
पाेलिस पथकाने केले
सीसीटीव्ही फुटेज जप्त...
अटकेतील शिक्षक आणि पीडित महिला लाॅजवर जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. तासाभरानंतर दाेघे लाॅजमधून बाहेर पडतानाचेही सीसीटीव्हीत दिसून येत आहे. इतर तिघांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद नाहीत. त्यांचा शाेध सुरु आहे, असेही पाेनि. पाटील म्हणाले.