उदगीर शहरात बारा कोटींची फसवणूक; राजस्थानी मल्टिस्टेटच्या संचालकावर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Updated: June 3, 2024 22:42 IST2024-06-03T22:42:40+5:302024-06-03T22:42:49+5:30
संचालकांविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहरात बारा कोटींची फसवणूक; राजस्थानी मल्टिस्टेटच्या संचालकावर गुन्हा
उदगीर (जि. लातूर) : राजस्थानी मल्टिस्टेट काे-ऑपरेटिव्ह क्रेडिट साेसायटीच्या खातेदारांची तब्बल बारा काेटी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत उदगीर शहर पाेलिस ठाण्यात साेमवारी सायंकाळी संचालकांविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी धनराज विरशेट्टी बिरादार (वय ६३, रा. विद्याविहार कॉलनी, शेल्लाळ रोड, उदगीर) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांची ११ लाख ३१ हजार ७६५ रुपये आणि इतरांचे २ कोटी २६ लाख २० हजार असे एकूण २ कोटी ३७ लाख ५१ हजार ७६५ रुपये, उदगीर शहरासह परिसरातील ९४५ नागरिकांचे असे एकूण जवळपास बारा कोटी रुपयांची फसवणूक केली. ही फसवणूक १९ नोव्हेंबर २०२२ ते ३ जून २०२४ अखेर राजस्थानी मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथ, जि. बीड, उदगीर शहरातील देगलूर रोड येथील शाखेने फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत उदगीर शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अध्यक्ष चंदूलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतिष सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, संचालिका प्रेमलता बाहेती, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम कुलकर्णी, सरव्यवस्थापिका अर्चना मुंदडा, संचालिका कल्पना बियाणी, मुदत ठेव अधिकारी विद्याधर वैद्य (सर्व रा. परळी वैजनाथ जि. बीड), मॅनेजर हेमंत भास्कर जकाते (रा. संभाजीनगर), व्यवस्थापक राधाश्याम जंवर (रा. संभाजीनगर), वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मनोज चव्हाण, अनंत भाग्यवंत यांच्याविरुद्ध सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.