लातूरच्या प्रवाशांसाठी बारा रेल्वेगाड्या सुसाट; देशाच्या कानाकाेपऱ्यांत सहज पोहचता येणार!
By राजकुमार जोंधळे | Published: December 7, 2022 07:24 PM2022-12-07T19:24:14+5:302022-12-07T19:24:35+5:30
लातूरच्या प्रवाशांना देशाच्या कानाकाेपऱ्यांत सहज प्रवास करता येणार आहे.
लातूर : कोरोना काळात माेजक्याच धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय झाली. त्यातून अनेकांनी खासगी ट्रॅव्हल्स, वाहनांचा आधार घेत प्रवास केला. मात्र, काेराेना ओसरल्यानंतर रेल्वे विभागानेही टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केलेल्या आहेत. एकट्या लातूर स्थानकातून सध्याला जवळपास १२ रेल्वेगाड्या धावत आहेत. त्याबाबचे वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे. त्यातून लातूरच्या प्रवाशांना देशाच्या कानाकाेपऱ्यांत सहज प्रवास करता येणार आहे.
लातूर रेल्वेस्थानकातून नियमित धावणाऱ्या रेल्वेगाड्यामध्ये लातूर-पुणे-मुंबई, बीदर-लातूर-मुंबई, हडपसर-लातूर-हैदराबाद, निजामाबाद-लातूर-पंढरपूर, मिरज-लातूर-परळी वैजनाथ, काेल्हापूर-लातूर-नागपूर, काेल्हापूर-लातूर-धनाबाद, नांदेड-लातूर-पनवेल, यशवंतपूर-लातूर आणि अमरावती-लातूर-पुणे यांचा समावेश आहे. दरराेज रात्रीच्या वेळी लातूर येथून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ हाेणाऱ्या रेल्वेत लातूर-मुंबईचा समावेश आहे. आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या रेल्वेत बिदर-मुंबईचा समावेश आहे. त्याचबराेबर दरराेज धावणाऱ्यांमध्ये मिरज-परळी, निजामाबाद-पंढरपूर, हडपसर-हैदराबाद या रेल्वेंचा समावेश आहे.
आठवड्यातून तीन दिवस यशवंतपूर-लातूर एक्स्प्रेस...
लातूर रेल्वेस्थानकातून यशवंतपूरसाठी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे आठवड्यातील तीन दिवस धावणार आहे. या रेल्वेला प्रवाशांचा माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर, धनबादसाठी लातुरातून रेल्वेची साेय...
काेल्हापूर येथून धावणाऱ्या दाेन एक्स्प्रेस गाड्यांचे नियाेजन रेल्वेने केले आहे. काेल्हापूर-नागपूर ही रेल्वे आठवड्यातून दाेन दिवस धावते तर काेल्हापूर-धनाबाद ही रेल्वे आठवड्यातून एकच दिवस धावते. या रेल्वेलाही प्रवाशांचा माेठा प्रतिसाद आहे. या दाेन्ही रेल्वे लातूर स्थानकातून धावतात.