मांजरात पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा वीस हजार हेक्टरला फटका
By हणमंत गायकवाड | Published: January 1, 2024 06:18 PM2024-01-01T18:18:18+5:302024-01-01T18:19:23+5:30
उजव्या कालव्या अंतर्गत साडेसात तर डाव्याअंतर्गत साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र कोरडे
लातूर: ‘मांजरात’ यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा साठा झाला नसल्यामुळे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्या अंतर्गत सिंचन क्षेत्र कोरडे राहणार आहे. परिणामी, या पाण्यावर अवलंबून असलेला ऊस शेतकऱ्यांना यंदा मोडावा लागणार आहे. उजव्या कालव्याअंतर्गत ७ हजार ६६५ आणि डाव्या कालव्या अंतर्गत १० हजार ५५९ हेक्टर क्षेत्र बिगर ओलीताखाली राहणार आहे.
मांजरा प्रकल्पांतर्गत केज, कळंब, अंबाजोगाई, लातूर या चार तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली आहे. डावा कालवा ९० किमी अंतराचा असून सिंचन क्षेत्र १० हजार ५५९ हेक्टर आहे. तर उजवा कालवा ७६ किमी अंतराचा असून या कालव्या अंतर्गत ७ हजार ७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. दोन्ही काव्याअंतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र यंदा धरणात पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम व पाण्यावर घेण्याची अन्य पिके घेता येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जे पाणी धरणात आहे. ते पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे यंदा शेतीला पाणी मिळणार नाही. पिण्यासाठीच पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
कालव्या अंतर्गत ६० टक्के उसाचे पीक....
मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या क्षेत्रावर बहुतांश ऊस आहे. जवळपास ६० टक्के क्षेत्र उसाचेच आहे. येथील काही ऊस आता तोडणीवर आहे. तर काहींची तोडणी झालेली आहे. परंतु पाणी नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना हा ऊस मोडावा लागणार आहे. केवळ आणि केवळ कालव्याच्या पाण्यावर आहे असे क्षेत्र साठ टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील ऊस यंदा मोडण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांकडे दुसरा नाही.
लातूर मनपाकडून पाणी वापरात काटकसर
मांजरा प्रकल्पात सध्या २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. जिवंत पाणीसाठा पिण्यासाठा जून अखेर पुरू शकतो. तरीपण लातूर महानगरपालिकेने पाणी वापराच्या अनुषंगाने काटकसर सुरू केली आहे. चार ते पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता सात दिवसाआड केला आहे. दोन दिवस पुढे वाढविलेला आहे. यामुळे दररोज पाण्याची बचत होत आहे. पुढील चार महिन्यांमध्ये ०.४० एमएम क्यूब पाण्याची बचत होणार असल्याची माहिती लातूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.