अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास

By हणमंत गायकवाड | Published: May 27, 2023 08:08 PM2023-05-27T20:08:51+5:302023-05-27T20:09:16+5:30

निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Twenty years in prison for raping a minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास

googlenewsNext

लातूर : चाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने १९ मे रोजी हा निकाल दिला आहे.

पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या मुलाचे तिच्या घरी येणे-जाणे होते. पीडित मुलीची आई सात वर्षांपूर्वी मृत झाली असून घरी तिची बहीण, भाऊ व वडील राहतात. वडील शेती करतात. ते रात्री झोपण्यासाठी शेतात जातात. या बाबीचा गैरफायदा घेऊन फेब्रुवारी २०२० मध्ये रात्रीच्या वेळी घरात शिरून तुझ्याशी लग्न करतो म्हणून आरोपीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. मुलीने नकार दिला तरी बळजबरी केली. कुणाला सांगू नकोस म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा पीडितेशी संबंध ठेवले. त्यातून पीडिता गरोदर राहिली. सरकारी दवाखान्यात प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ लगेच मृत झाले. दरम्यान, याबाबत ५ सप्टेंबर २०२० रोजी तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर पोलिसात कलम ३७६, २ एन, ३७६ ३, 3 ४५२, ५०६ भादंवि व बाललैंगिक प्रतिबंध अत्याचार कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक मल्लया स्वामी यांनी तपासादरम्यान पीडित मुलगी, आरोपी व पीडित मुलीने जन्म दिलेल्या बाळाचे डीएनए नमुने प्रयोगशाळेत पाठविले.

दरम्यान, वैद्यकीय तपासणी व पीडितेच्या जन्माबाबतचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाने १२ साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यांमध्ये सरकार पक्षाने पीडित मुलीचे वय १६ वर्षांच्या खाली असल्याचे मुख्याध्यापकांच्या साक्षीतून व जन्मदाखल्यातून सिद्ध झाले. पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, मुलीच्या सावत्र आईचा जबाब व तपास अधिकारी यांची साक्ष तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरून निलंगा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. नागलकर यांनी आरोपीस वीस वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता कपिल विजय पंढरीकर यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एल. यु. कुलकर्णी व कोर्ट पेहरवीकर व्ही. बी. कोंपले यांनी मदत केली.

Web Title: Twenty years in prison for raping a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.