अडीच महिने उलटले; शेतकऱ्यांना विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळेनात!
By हरी मोकाशे | Published: September 13, 2023 07:32 PM2023-09-13T19:32:52+5:302023-09-13T19:35:07+5:30
उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी १२८ गावांत अधिग्रहणे
लातूर : सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाने ताण दिल्याने धास्ती वाढली आहे. दरम्यान, गत उन्हाळ्यात रविराजाने रौद्ररूप धारण केल्याने जिल्ह्यातील १३९ गावांना पाणीटंचाईचे चटके जाणवत होते. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १२८ गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ४१ लाख ३७ हजार रुपये पाणी बिल अडीच महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चौकशी करण्यास सुरूवात झाली आहे.
गत उन्हाळा अधिक तीव्र होता. सूर्यनारायणाच्या वाढत्या उष्णेतमुळे जीवाची काहिली होत होती. दुपारी रस्तेही निर्मनुष्य होत होते. त्याचबरोबर बाष्पीभवनाचा वेग वाढला होता. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत होती. जिल्ह्यात असलेल्या ८ मध्यम प्रकल्पांतील जलसाठा खालावत होता. वाढत्या उन्हामुळे विहिरी, कुपनलिका काेरड्या पडू लागल्या होत्या. त्याचबरोबर काही ठिकाणच्या नळ योजनाही पाण्याअभावी बंद पडल्या होत्या. परिणामी, तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच पाऊस लांबल्याने ताण वाढला होता. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील १३९ गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत होत्या. पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जून अखेरपर्यंत १२८ गावांना विहीर, बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.
शेतकऱ्यांकडून वारंवार चौकशी...
गत उन्हाळा अधिक कडक होता. त्यामुळे गावातील जलस्रोत आटू लागले होते. परिणामी गावात पाणीटंचाई जाणवत होती. अशा परिस्थितीत आम्ही उन्हाळी पिकांना पाणी देण्याऐवजी गावाला पाणी पुरवठा केला. अधिग्रहण बंद होऊन अडीच महिने उलटले तरी अद्यापही अधिग्रहणाचे बिल मिळालेले नाही. हे बिल मिळावे म्हणून सातत्याने पंचायत समितीकडे चौकशी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव...
जिल्ह्यात गत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई होती. टंचाई निवारणासाठी १२८ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. त्यासाठी ४१ लाख ३७ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना बिल अदा करण्यात येईल.
- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे व पाणी पुरवठा.
अहमदपुरात पाणी समस्या सर्वाधिक...
तालुका - अधिग्रहण - बिल
लातूर - ०५ - १८३६००
औसा - ४४ - १०८६६००
रेणापूर - ०६ - २५००००
अहमदपूर - ५१ - १९९१४००
चाकूर - ०९ - १७००००
उदगीर - ०५ - १६५०००
जळकोट - ०८ - २९०४००
एकूण - १२८ - ४१३७०००