अवैध दारूवर छापा टाकताना पोलिस अधिकाऱ्यास मारहाण
By राजकुमार जोंधळे | Published: June 1, 2023 08:47 PM2023-06-01T20:47:43+5:302023-06-01T20:47:59+5:30
दोघांना अटक : भादा पोलिस ठाण्यात गुन्हा
राजकुमार जोंधळे / औसा (जि.लातूर) : तालुक्यातील बिरवली येथे बेकायदा दारु विक्रीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या सहायक पोलिस निरक्षकाला दोघांनी धक्काबुक्की करुन मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही गुरुवारी अटक केली असून, औसा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील बिरवली येथे एक पत्र्याच्या शेडसमोर सुरु असलेल्या दारूवर छापा मारण्यासाठी भादा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे हे चालक फड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन २७ मे रोजी दुपारी गेले होते. दरम्यान, दारु विक्री करणारे संदीप दिलीप गरड आणि प्रवीण दिलीप गरड (दोघेही रा. बिरवली ता. औसा) यांनी ' तू कोण? आमची दारु बंद करणारा? असे म्हणत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचबरोबर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याबाबत भादा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब विष्णू डोंगरे (वय ३२) यांनी फिर्यादीवरून संदीप गरड, प्रवीण गरड याच्याविरोधात गुरनं. ११७/ २०२३ / कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ भदंवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.