घरफाेडीतील दाेघा आराेपींना उचलले; दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: December 16, 2022 06:38 PM2022-12-16T18:38:20+5:302022-12-16T18:38:37+5:30
चाकूर पाेलिसांच्या कारवाईत दाेन गुन्ह्यांचा उलगडा
लातूर : घरफाेडीतील दाेघा आराेपींना चाकूर ठाण्यांच्या पथकाने उचलले आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या दाेन गुन्ह्यांतील ३ लाख ८० हजार रुपयांचे साेन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. अधिक चाैकशीमध्ये आराेपींनी दाेन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील गांजूर आणि शिवणखेड येथे सप्टेंबर आणि ऑक्टाेबरमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी दाेन घरे फाेडली हाेती. घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि काही रक्कम चोरून नेल्याच्या घटना घडल्या. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. या गुन्ह्याच्या तपासाचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास केला. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शाेध घेतला. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शिवमणी संतोष भोसले (२१, रा. निलंगा) आणि विजय बब्रू भोसले (२१, रा. तुळजापूर) यांना अटक केली. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी दाेन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्ह्यात चोरलेले ३ लाख ८० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार भागवत मामडगे करत आहेत.
ही कारवाई चाकूरचे पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, कपिल पाटील, आकाश कातपूरे, नितीन मामडगे, भागवत मामडगे यांच्या पथकाने केली.