तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 07:41 PM2020-07-02T19:41:34+5:302020-07-02T19:42:47+5:30
तिघे मित्र पोहण्यासाठी तलावावर गेले होते़ तलावात पोहताना यातील दोघे गाळात अडकले
उदगीर ( जि़ लातूर) : उदगीर तालुक्यातील हणमंतवाडी (देवर्जन) येथील तीन मुले गावालगतच्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेली होती़ दरम्यान, त्यातील दोघांचा तलावातील गाळात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़
इंद्रजित अंतेश्वर माचोळे (१२) व गोविंद बोयणे (१२) असे मयत मुलांची नावे आहेत़ उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, हणमंतवाडी (देवर्जन) (ता. उदगीर) येथे गावालगत पाझर तलाव आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तलाव भरला आहे. या तलावातील गाळ काढण्यात आल्यामुळे जागो जागी खड्डेही पडले आहेत़ दररोज या भागात म्हशी चारण्यासाठी लहान मुलेही जातात़ गुरुवारी सकाळी ११ वा़ च्या सुमारास हनमंतवाडी येथील इंद्रजित अंतेश्वर माचोळे (१२), गोविंद बोयणे (१२) व नागेश बळीराम माचोळे (१४) हे तिघे मित्र पोहण्यासाठी तलावावर गेले होते़ तलावात पोहताना यातील दोघे गाळात अडकले, तर नागेश माचोळे हा बाहेर येण्यात यशस्वी ठरला.
त्याचे दोन मित्र दिसत नसल्याने तो घाबरून गावात धाव घेऊन ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी तलावाकडे जाऊन पाहिले असता ते दोघेही तलावात असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांचा शोध घेऊन दोघांना बाहेर काढले आणि तात्काळ देवर्जन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंद्रजित माचोळे याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, तर गोविंद बोयणे याच्यावर प्राथमिक उपचार करुन उदगीरला हलविले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देवर्जनचे बीट जमादार किशन शेळके यांनी दिली.
देवर्जन, हनमंतवाडीवर शोककळा...
दोन चिमुकल्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याने देवर्जन, हनुमंतवाडी या दोन गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती कळताच बीट जमादार शेळके यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.