गुळ पावडरच्या विक्रीत दोन कोटींची फसवणूक; हैद्राबादच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:56 PM2020-01-14T17:56:47+5:302020-01-14T17:59:02+5:30
हैदराबाद येथील व्यंकटेश ग्लोबल कंपनीने २ कोटी ७५ लाखांची पावडर २० ते २६ डिसेंबर २०१९ या कालावधीत नेली़
मुरुड (जि. लातूर) : साखर कारखान्यासोबत लेखी करार करून घेऊन गेलेल्या गूळ पावडरची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन १ कोटी ९९ लाख ४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पांडू मोरामी शेट्टी (रा़ रस्ता क्ऱ १०, कृष्णानगर, हैदराबाद) व सुधाकरन बी़व्ही़ (रा़ आळंदी रोड, पुणे) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, मुरुडनजीकच्या वाठवडा (ता़ कळंब) येथे डी़डी़एऩ शुगर फॅक्टरीत गूळ पावडरचे उत्पादन होते़ ही पावडर आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करण्यात येते़ या कारखान्याशी तेलंगणा येथील व्यंकटेश ग्लोबल कंपनीने २० डिसेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ या कालावधीत लेखी करार करुन २७ हजार ५०० रुपये प्रति टनाप्रमाणे एक हजार टन गूळ पावडर खरेदी केली़ या दरानुसार तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील व्यंकटेश ग्लोबल कंपनीने २ कोटी ७५ लाखांची पावडर २० ते २६ डिसेंबर २०१९ या कालावधीत नेली़
दरम्यान, करारानुसार ८० लाख ७० हजार ५५० रुपये धनादेशाच्या माध्यमातून कारखान्यास दिले़ परंतु, उर्वरित १ कोटी ९९ लाख ४ हजार ३७५ हजार रुपये देण्यास तेलंगणातील कंपनीने टाळाटाळ केली़ वारंवार मागणी करूनही रक्कम न दिल्याने कारखान्याचे मालक विजय प्रकाशराव नाडे यांनी संबंधित कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली़ होती.न्यायालयाच्या आदेशानुसार मुरुड पोलीस ठाण्यात आरोपी पांडू मोरामी शेट्टी व सुधाकरन बी़व्ही़ या दोघांविरुद्ध कलम ४०६, ४२०, ३४ भादंविप्रमाणे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नाही़