दोन घरे फोडून सहा लाखांचा ऐवज पळविला
By हरी मोकाशे | Published: December 3, 2022 06:33 PM2022-12-03T18:33:07+5:302022-12-03T18:33:23+5:30
या प्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला
लातूर : निलंगा तालुक्यातील बेंडगा येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी ६ लाख ९ हजारांचा ऐवज पळविला. त्यात राेख रकमेसह सोन्या- चांदीच्या दागिने आहेत. याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील बेंडगा येथील सचिनकुमार अशोकराव धुमाळ यांच्या घराच्या भिंतीवरून ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सात तोळ्यांचे साेन्याचे दागिने व तीन ग्रॅमचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले. त्याची किंमत ३ लाख २१ हजार आहे.
दरम्यान शेजारी सोपान भगवंतराव धुमाळ यांचेही घर चोरट्यांनी फोडले. तेथील राेख रक्कम, सोन्या चांदीच्या दागिण्यांसह एकूण २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज पळविला. विशेष म्हणजे, साेपान धुमाळ यांनी आपल्या सोयाबीनची विक्री करुन १ लाख ४० हजार रुपये घरी आणून ठेवले हाेते. याप्रकरणी सचिनकुमार धुमाळ यांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे हे करीत आहेत.