उदगिरात एकाच रात्री दोन घरे फोडली; चार लाखांचा मुद्देमाल पळविला
By राजकुमार जोंधळे | Published: January 3, 2023 06:33 PM2023-01-03T18:33:20+5:302023-01-03T18:33:49+5:30
उदगीर शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चाेरीबराेबरच घरफाेड्यांच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे.
उदगीर : एकाच रात्री अज्ञात चाेरट्यांनी दाेन घरे फाेडून साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात साेमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील पिंपरी येथील बाबूराव भाऊराव केंद्रे आणि गंगाधर विठ्ठल मुंडे यांची घरे एकमेकांना लागूनच आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री बाबूराव केंद्रे यांचे घर आणि शेजारी असलेले गंगाधर विठ्ठल मुंडे यांच्या घर चाेरट्यांनी फाेडले. गंगाधर मुंडे यांच्या घराचा दरवाजा उचकटून, कुलूप तोडून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील पेटीमध्ये ठेवण्यात आलेले १२ तोळे सोन्याचे दागिने (किंमत ३ लाख ८५ हजार), दहा तोळे चांदीचे दागिने (किंमत पाच हजार) आणि रोख १७ हजार असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा ते शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात बाबूराव केंद्रे यांनी दिलेल्या संयुक्त तक्रारीवरून सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफाेडीच्या घटनांत वाढ...
उदगीर शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चाेरीबराेबरच घरफाेड्यांच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे. एकाच रात्री पिंपरीत दाेन घरे फाेडल्याने गावकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. घटनास्थळी लातूर ग्रामीण पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. शिवाय, पंचनामा केला आहे. चाेरट्यांचा माग काढण्यासाठी पथक तैनात केले आहे.