लातूर शहरात दररोज दोनशे टन नवा कचरा; विल्हेवाट नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग
By हणमंत गायकवाड | Published: April 1, 2024 07:38 PM2024-04-01T19:38:58+5:302024-04-01T19:39:22+5:30
तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन आणि जनाधार संस्थेची संयुक्त बैठक
लातूर : शहरात दररोज २०० टन नवा कचरा निर्माण होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मनपा प्रशासन आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेची संयुक्त बैठक नुकतीच झाली असून आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासंदर्भात तोडगा काढण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आठ दिवसांत साफ करण्यासंदर्भात संस्थेला सूचित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने काम करायला प्रारंभ झाला आहे.
लातूर शहरामध्ये ७८ हजार मालमत्ताधारकांची संख्या होती. ती आता सव्वालाखाच्या घरात गेली आहे. ४८ हजार घरे वाढीव झाली आहेत. यामुळे कचरा वाढला आहे. कचरा वाढल्यामुळे व्यवस्थापन संस्थेवरचा ताण वाढला आहे. ज्या तुलनेत कचरा वाढला. त्या तुलनेत संस्थेकडे मनुष्यबळाची वाढ झालेली नाही. परिणामी, शहरातील कचरा उचलताना अनियमित आली आहे. यामुळे कचरा उचलणारी संस्था आणि मनपा प्रशासनात वाद निर्माण झाला होता.
गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेत साचला कचरा...
लातूर शहरानजीक गेलेल्या रिंगरोड तसेच बार्शी रोडच्या समांतर रस्त्यावर, दयानंद महाविद्यालयाच्या बाजूने असलेल्या भाजीपाल्याच्या रयतू बाजारात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत.
घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेतही कचरा साचलेला आहे.
कचरा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरही कारवाईसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहेत; पण त्याआगोदर घरोघरी निर्माण होणारा कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे.
आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देश
शहरातला कचरा संकलन करताना अडचणी आल्या होत्या; मात्र आता त्या दूर झाल्या असून, संबंधित संस्थेला आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देश बैठक घेऊन देण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनाबाबतचे निवडणुकीनंतर त्याबाबतची प्रक्रिया होऊ शकते. प्राप्त स्थितीत जुन्या संस्थेकडे कचरा व्यवस्थापनाचे काम आहे.
- रमाकांत पिडगे, स्वच्छता विभागप्रमुख मनपा
आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावर
आठ हजार रुपये वेतनावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आमच्या काही मागण्या महानगरपालिका प्रशासनाकडे होत्या. त्यातील काही मागण्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शहरात कचरा वाढलेला आहे. त्याबाबतचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाईल. आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावर येईल.
- संजय कांबळे, जनाधार संस्था, लातूर