ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर
By आशपाक पठाण | Published: September 16, 2022 04:35 PM2022-09-16T16:35:19+5:302022-09-16T16:38:57+5:30
विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही.
लातूर : वाहन चालविण्याची हौस सर्वांनाच आहे, मात्र आपण रस्त्यावर विना परवाना चालवित असलेले वाहन हे स्वत:सह इतरांसाठीही यमदूत बनू शकते, हे अद्यापही अनेकांच्या लक्षात आलेले नाही. लातूर जिल्ह्यात तब्बल २ लाखांवर वाहन चालक विना परवाना फिरत आहेत.
विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. अनेकदा वाहन चालविण्यात पटाईत असलेले शिक्षणाचा अभाव असल्याने परवान्याला गांभीर्याने घेत नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात परवान्यासाठी अधिक उदासिनता असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे ट्रॅक्टर, दुचाकीचालक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. ऑगस्ट २०२२ पर्यंत लातूर जिल्ह्यात वाहनांची एकूण संख्या ५ लाख ३० हजार ४७ इतकी झाली आहे. वाहनांच्या तुलनेत मात्र परवान्याची संख्या ५० टक्केच्या जवळपास आहे. गाव सोडून शहरात आल्यावर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करीत असल्याने अनेकजण मार्ग बदलून, धोका पत्करून प्रवास करीत असतात, यातून अपघाताच्या घटनाही घडतात. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६३ हजार जणांनी वाहन परवाना काढला आहे. दरवर्षी जवळपास १५ ते २० हजार जण वाहन परवाना काढत आहेत. परिवहन विभागाकडून १७ सप्टेंबर वाहन चालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त वाहन परवान्यावर प्रकाश टाकण्यात आला.
२ लाख ६३ हजार जणांकडे परवाना...
लातूर जिल्ह्यात २ लाख ६३ हजार जणांकडे वाहन परवाना आहे. मागील ५ वर्षांची आकडेवारी लक्षात घेता परवाना काढणाऱ्यांची संख्या वार्षिक २० हजारांच्या घरात पोहचली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत १४ हजार ३६७ जणांनी वाहन परवाना काढला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात आली.
तर दहा हजारांचा दंड...
विना परवाना वाहन चालवित असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर सेक्शन १८०/१८१ अंतर्गत १० हजार रूपये दंडाची तरतूद आहे. मागील वर्षभरापासून विना परवाना वाहन चालविणार्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. आता वाहन परवान्यासाठी ऑनलाईन सोय झाली आहे. स्वत:बरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी वाहन परवाना अत्यंत आवश्यक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात वाहनांची संख्या ५ लाखांवर असून वाहन चालविण्याचा परवाना मात्र २ लाख ६३ हजार ३६१ जणांकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाहन संख्या : दुचाकी - ४ लाख ५२ हजार ५३१
चारचाकी - ६६ हजार ८४९
अवजड वाहने - १० हजार ६६७
वर्षनिहाय वाहन परवाने...
२०११ : १६०९०
२०१२ : १५६३६
२०१३ : १८२१२
२०१४ : १३५०७
२०१५ : १६२३७
२०१६ : २०, ६४०
२०१७ : १४,८८०
२०१८ : १८,५५३
२०१९ : २०,०५६
२०२० : १७,९३८
२०२१ : १९,५१४
जाने-ऑगस्ट २०२२ : १४,३६७
आजवरचे एकुण परवाने : २ लाख ६३ हजार ५६१