पावसाळ्यातील दोन महिने उलटले; लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा!
By हरी मोकाशे | Published: August 9, 2023 06:49 PM2023-08-09T18:49:36+5:302023-08-09T18:50:13+5:30
मोठ्या पावसाची प्रतीक्षा :लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ मिमी नोंद
लातूर : पावसाळ्यातील दोन महिने उलटले असले तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले अद्यापही वाहिले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जवळपास आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३१८.४ मिमी पाऊस झाला आहे.
यंदा मृग नक्षत्र कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली होती. आर्द्रा नक्षत्रात अल्प प्रमाणात पावसाने बरसात केली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ झाला. मात्र, तो सर्वत्र नव्हता. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात सतत पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला. दरम्यान, पुष्य नक्षत्राच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात पेरण्या सुरूच होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्याने विलंबाने पेरण्या झाल्या. सध्या खरिपातील पिके बहरत आहेत. लवकर पेरणी केलेल्या क्षेत्रावरील सोयाबीनला फुले लागण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या अल्प पावसामुळे शेतातील पिकांमध्ये तण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी तणनाशकांची फवारणी करीत आहेत. आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशागतीच्या कामास वेग आला आहे.
पावसाळ्यातील दोन महिने उलटले तरी अद्यापही सातत्याने दमदार पाऊस नाही. त्यामुळे नदी-नाले वाहिले नाहीत. तसेच जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मागील वर्षी ९७ दलघमी जलसाठा...
गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात एकूण ९७.८९१ दलघमी जलसाठा होता. आता २५.१५१ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील १३४ लघु प्रकल्पात ६४.८६३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची २०.६४ अशी टक्केवारी आहे.
साकोळ प्रकल्पात ४३ टक्के जलसाठा...
मध्यम प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा - टक्केवारी
तावरजा - ०.८६२ - ४.२४
व्हटी - जोत्याखाली - ००
रेणा - ५.२१८ - २५.३९
तिरू - जोत्याखाली - ००
देवर्जन - ४.२१९ - ३९.५०
साकोळ - ४.७१० - ४३.०२
घरणी - ६.१२७ - २७.२७
मसलगा - ४.०१५ - २९.५२
एकूण - २५.१५१ - २०.५९
ऑगस्टच्या आठवडाभरात ५.७ मिमी पाऊस...
तालुका - आठवडाभरात - आतापर्यंत
लातूर - ३.९ - ३०२.१
औसा - १०.९ - २५०.८
अहमदपूर - ४.९ - २९५.१
निलंगा - ९.४ - ३०६.४
उदगीर - २.७ - ४३०.२
चाकूर - १.१ - २६८.४
रेणापूर - १.२ - २५२.५
देवणी - १०.३ - ४९१.६
शिरूर अनं.- ९.० - ३४८.७
जळकोट - १.३ - ३६८.३
एकूण - ५.७ - ३१८.४