बँक कर्ज फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक, 6 दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:16 PM2021-10-22T21:16:02+5:302021-10-22T21:16:50+5:30
फिर्यादीने अनेकदा तगादा लावूनही बँकेचे कर्ज आणि घराचे बांधकामही करून दिले नाही़ यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली
लातूर : बँक कर्ज मिळवून देतो, त्याचबरोबर तुमच्या घराचे बांधकाम करुन देतो, असे म्हणून १२ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी एकाला विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अधिक चौकशीनंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आणखी दोघांना लातुरातून अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही लातूरच्यान्यायालयात दुपारी हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले, बँकेचे कर्ज मिळवून देण्याबरोबर घराचे बांधकाम करुन देतो, अशी थाप मारून युसूफ जाफर शेख (३२, रा. वीर हणमंतवाडी, लातूर) याने फिर्यादीची आर्थिक फसणवूक केली.
फिर्यादीने अनेकदा तगादा लावूनही बँकेचे कर्ज आणि घराचे बांधकामही करून दिले नाही़ यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. चौकशीनंतर प्रकरण गंभीर असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पाेलीस पथकाने युसूफ शेख याच्या खासगी कार्यालयावर छापा मारून झाडाझडती घेतली. यावेळी बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी लागणारे विविध शासकीय कार्यालयांचे ५४ बनावट शिक्के, संगणक, प्रिंटर, हार्ड डिस्क असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता, या प्रकरणातील अन्य आरोपींची नावे समोर आली. या प्रकरणात खय्युम जाफर शेख (३१, रा. वीर हणमंतवाडी, लातूर) आणि पुरुषोत्तम ज्ञानोबा यलगरवाड (३९, रा. मजगे नगर, लातूर) या दोघांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लातुरातून उचलण्यात आले. त्यांना लातूर येथील न्यायालयात दुपारी हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
घरीच तयार केले शिक्के
ताब्यात असलेल्या पुरुषोत्तम यलगरवाड यांचे बाजारपेठेत शिक्के तयार करण्याचे दुकान होते. ते काही वर्षांपूर्वी त्यांनी बंद केले. दुकानात असलेली मशीन त्यांनी घरीच ठेवली होती. याची माहिती युसूफ शेख याला मिळाली. त्याने पुरुषोत्तम यलगरवाड याला गाठले. काही अधिक रक्कम देऊन त्याने विविध शासकीय, निमशासकीय आणि विविध बँकांचे बनावट शिक्के तयार करून घेतले. या शिक्क्यांचा वापर त्याने बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी वापरल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलीस अधिक कसून चौकशी करत असल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर म्हणाले.