खून प्रकरणी भावासह दोन पुतण्यांना आजन्म सश्रम कारावास
By हरी मोकाशे | Published: March 10, 2023 08:48 PM2023-03-10T20:48:09+5:302023-03-10T20:48:23+5:30
शेतातील नाली काढण्यावरुन झाली होती हत्या
लातूर : शेतातील नाली काढण्यावरुन दोघा भावांमध्ये वाद झाला. तेव्हा भावाने आणि त्याच्या दोन मुलांनी चुलत्याचा खून केल्याची घटना मार्च २०१७ मध्ये देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथे घडली होती. या प्रकरणाची सुनावणी उदगीरच्या सत्र न्यायालयात शुक्रवारी होऊन न्या. पी.डी. सुभेदार यांनी तिन्ही आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबळी येथील मयत गोविंद हणमंतराव पाटील व त्यांचा भाऊ आरोपी राजाराम हणमंत पाटील यांच्यात दिवाणी न्यायालयातून वाटणी झाल्यापासून आपआपसांत बोलणे नव्हते. दरम्यान, आरोपी राजाराम हे शेतातील नाल्यातील खडक माती काढून आपल्या बाजूने टाकून घेत होते. तेव्हा गोविंद यांनी असे करु नको म्हणाले. त्यावेळी आरोपीने तुला जेसीबीखाली गाढून नाला काढतो असे म्हणत हाताला धरले. आरोपीची मुले विष्णूदास राजाराम पाटील व रोहिदास राजाराम पाटील यांनी काठ्या घेऊन येऊन खतम करा असे म्हणत मारले. त्यात गोविंद यांचा मृत्यू झाला. तसेच मयताची पत्नी व मुलास मारहाण केली. याप्रकरणी देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालिन पोउपनि. एस.एन. सगर यांनी तपास करुन उदगीरच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षी दाखल करण्यात आल्या. तेव्हा मयताची आणि जखमींची वैद्यकीय कागदपत्रे, वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. तेव्हा न्या. पी.डी. सुभेदार यांनी आरोपी राजाराम पाटील, विष्णूदास पाटील, रोहिदास पाटील या तिघांना कलम ३०२ भादविप्रमाणे आजन्म सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, कलम ३२४ नुसार तिन्ही आरोपींना प्रत्येक एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम ५०६ भादविप्रमाणे आरोपींना प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला आहे. सरकारी वकिल ॲड. एस.आय. बिराजदार यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.