एक ट्रॅक्टर, चार दुचाकीसह पाेलिसांकडून दाेघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: April 21, 2023 08:07 PM2023-04-21T20:07:47+5:302023-04-21T20:07:53+5:30
स्थागुशाची कारवाई : लातूरसह पुणे जिल्ह्यातही वाहनचाेरी...
लातूर : एक ट्रॅक्टर, चार दुचाकीसह दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, सखाेल चाैकशीतून चार गुन्हे उघड झाले आहेत.
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचाेरी बराेबरच इतर चाेरीच्या घटना अलिकडे वाढलेल्या आहेत. यातील आराेपींच्या अटकेसाठी विविध पथकांकडून प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून यातील आराेपींचा शाेध घेण्याचा प्रयत्न सुरु हाेता. दरम्यान, गांधी चौक पाेलिस ठाण्यात दाखल चाेरीच्या गुन्ह्यातील दुचाकी लिंबाळा दाऊ गावातील एका तरुणाकडे असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थागुशाचे पथक लिंबाळा दाऊ (ता. औसा) गावात धडकले. घरासमोर दुचाकीसह थांबलेल्या व्यक्तीला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने मल्लिनाथ ऊर्फ गोट्या रतन धुळे (वय २७, रा. हासेगाव, ता औसा) असे नाव सांगितले. अधिक चाैकशी केली असता, दुचाकी लातूर शहरातून चोरल्याची कबुली दिली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमया मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलिस अंमलदार अंगद कोतवाड, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण, राहुल कांबळे, मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.
लातूर, पुणे जिल्ह्यात केली वाहनांची चाेरी...
लातूरसह पुणे जिल्ह्यातून साथीदार पप्पू शामराव लाळे (रा. हसेगाव ता. औसा) यांनी वाहनांची चाेरी केली. त्यानुसार आरोपींना अटक करुन, चाेरी केलेल्या एकूण चार दुचाकी जप्त केल्या. तर तीन वर्षांपूर्वी शिरूर अनंतपाळ ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची चोरी केली हाेती. ताे ट्रॅक्टर नरेंद्र विठ्ठल मुरटे (वय ४३ रा. कोंड जागजी जि. धाराशिव) यांना विक्री केल्याची कबुली दिली.