लातूरच्या गोकुळ मंत्री खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा, तीन साक्षीदार झाले फितूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:36 PM2024-08-06T12:36:05+5:302024-08-06T12:36:22+5:30
२४ जणांची साक्ष, लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- राजकुमार जोंधळे
लातूर : सुपारी खाण्याचा बहाणा करत घराबाहेर बोलावून घेत चाकू, कोयत्याने सपासप वार करत गोकुळ मंत्री या तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात एकूण २४ जणांची न्यायालयात साक्ष झाली.
लातुरातील दादोजी कोंडदेव नगर येथे राहणारा तरुण गोकुळ बंडुलाल मंत्री (वय २७) हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. दरम्यान, १० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ वाजता गोकुळ मंत्री हे घरी होते. त्यावेळी आरोपी प्रसाद विठ्ठलराव शिंदे ( वय १९ ) आणि कौस्तुभ संजय कांबळे (वय २०, दोघे रा. यशवंत नगर, जुना औसा रोड, लातूर) हे दोघे त्यांच्या घराकडे आले. यावेळी सुपारी खाण्याच्या बहाण्याने गोकुळ मंत्री यांना घराबाहेर बोलावून घेतले. एकाच दुचाकीवरून सुपारी खाण्यासाठी ते निघाले. दरम्यान, सुपारी खाल्यानंतर गोकुळ मंत्री यांच्यावर हल्ला करण्यात आला. या खटल्यात सबळ पुरावे आणि साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीवरून न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी दोन्ही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाटला चालला. सरकार पक्षाकडून जिल्हा प्रमुख सरकारी अभियोक्ता संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकिल एस. आर. मुंदडा यांनी बाजू मांडली. त्यांना शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर, वकील ए. के. काझी, वकील ए. ए. वाघमारे, पोलिस कर्मचारी कडगे, तपास अधिकारी एस. बी. पुजारी यांनी सहकार्य केले.
दिशाभूल करून काढला गोकुळ मंत्री यांचा काटा...
सुपारी खाल्यानंतर आम्हाला दुचाकीवरून घराकडे सोड म्हणत गोकुळ मंत्री यांना दुचाकी चालविण्यास सांगितले. दरम्यान काही अंतरावर गेल्यानंतर दोघा आरोपींनी चाकू, कोयत्याने सपासप ४१ वार केले. त्यानंतर आरोपी घराकडे पायी गेले.
हल्ल्यात गोकुळ मंत्री रक्ताच्या थारोळ्यात पडले...
काही वेळात गोकुळ मंत्री यांच्या पत्नीला एका व्यक्तीने घटनेची माहिती दिली. पत्नीने घटनास्थळी धाव घेतली तर पती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. शरीरावर अनेक वार करण्यात आल्याचे दिसून आले. चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर गंभीर वार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी तीन साक्षीदारांनी न्यायालयामध्ये साक्ष फिरवली...
गोकुळ मंत्री यांच्यासह आरोपी दुचाकीवरून जाताना आणि आरोपी हल्ला करताना खिडकीतून पाहणारा अल्पवयीन मुलगा असे तीन जण साक्षीदार होते. मात्र, ऐनवेळी या साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवत फितुरपणा केला. मात्र, सरकार पक्षाकडून दाखल करण्यात असलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.