गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क

By संदीप शिंदे | Published: August 10, 2023 08:22 PM2023-08-10T20:22:18+5:302023-08-10T20:22:34+5:30

गजबजलेले ठिकाण असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसू लागला.

Two terrorists in Ganjgolai area Colorful training of the police, the police is on alert mode | गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क

गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क

googlenewsNext

लातूर : गजबजलेले ठिकाण असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसू लागला. याच भागात लपलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा सतर्क झाल्याची कुणकूण आजूबाजूच्या नागरिकांना लागली. काही क्षण भांबावलेले, गोंधळलेले होते. ज्यांना घटनेची माहितीच नव्हती, ते पोलिसांची गर्दी कशामुळे? याची उत्सुकतेने चर्चा करीत होते. थोड्याच वेळात दहशतवादी असल्याचे भासविणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आणि काही क्षणातच ही रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाले.

स्फोटकांची शक्यता 
दहशतवादी कारवायांमध्ये अथवा घातपात घडवून आणणाऱ्या ठिकाणी स्फोटक पदार्थ ठेवण्याची शक्यता ग्रहित धरून बॉम्बशोधक पथक, श्वानपथक दाखल झाले होते. फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून घटनास्थळातील इतर भौतिक दुवेही तपासले गेले.

दहशतवादी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात 
ताब्यात घेतलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना पथकाने ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या हवाली केले. अशा घटनांप्रसंगी गोंधळ उडतो. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते, हे लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीही गर्दी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळावरील गोंधळ दूर करण्यासाठी मेगा फोनद्वारे सूचना देण्यात आल्या. ज्यामुळे स्थिती विनाविलंब नियंत्रणात आली.

पोलिस अधीक्षकांचे निर्देश 
या रंगीत तालमीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गोसावी, प्रशिक्षणार्थी उपाधीक्षक अनिता कणसे, पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी चंदेल, उपनिरीक्षक जितू सिंग, उपनिरीक्षक आवेज काझी, उपनिरीक्षक अयुब शेख, अंगद कोतवाड, युसुफ शेख, मुख्तार शेख, संजय काळे, उत्तम जाधव, यशवंत मुंडे, दीपक वैष्णव, पोलिस निरीक्षक गफार शेख, बीडीएस पथकाचे उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, सुहास जाधव याबरोबरच अंगुली मुद्रा विभाग, अग्निशामक दल, वैद्यकीय कर्मचारी, दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत होते.

जनतेच्या सुरक्षेची दक्षता 
अतिरेकी कारवाया किंवा घातपाताच्या घटनांप्रसंगी घ्यावयाची खबरदारी आणि परिस्थिती कशी हाताळायची याबाबत मॉकड्रील मोहीम राबविली जाते. या रंगीत तालमीमधून यंत्रणा किती तत्पर आहे तसेच काही उणिवा राहिल्यात का, याचा शोध घेतला जातो. पोलिसांनी काय करावे, नागरिकांनी कसे सावध रहावे, याची माहिती कृतीतून दाखविली जाते. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षेच्या अनुषंगाने कायमस्वरूपी नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२२९६ किंवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Two terrorists in Ganjgolai area Colorful training of the police, the police is on alert mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.