लातूरमधील हरंगुळ रेल्वे स्थानकावर उभ्या दोन रेल्वे डब्यांना आग !
By हणमंत गायकवाड | Published: October 4, 2023 07:54 PM2023-10-04T19:54:20+5:302023-10-04T19:54:53+5:30
स्क्रॅपचे काम करत असताना आग लागली की अन्य कारण आहे. समजू शकले नाही.
लातूर : हरंगुळ रेल्वे स्टेशन नजीक स्क्रॅपसाठी उभ्या असलेल्या रेल्वे डब्यांना अचानक बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन डबे जळून खाक झाले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचेच कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
लातूर शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हरंगुळ रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनच्या नजीक स्क्रॅपसाठी रेल्वेचे चार डबे उभे केले आहेत. यातील काही डब्यांचे स्क्रॅप करण्यात आले आहे. त्यातील अचानक आग लागून दोन डबे जळून खाक झाले आहेत. स्क्रॅपचे काम करत असताना आग लागली की अन्य कारण आहे. समजू शकले नाही.
लातूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आग लागून दोन डब्याचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. आग कशामुळे लागली या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आगीचे कारण कळेल. सोलापूरचे पथकही चौकशीसाठी येणार असल्याचे समजते. दरम्यान, चौकशीनंतरच आगीचे कारण कळणार आहे.