दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीचा अपघात, दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:25+5:302021-09-02T04:44:25+5:30
केळगाव : रस्त्यावरील दुभाजकाचा अंदाज न आल्याने आणि दिशादर्शक फलक नसल्याने निलंगा तालुक्यातील निटूर येथे बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या ...
केळगाव : रस्त्यावरील दुभाजकाचा अंदाज न आल्याने आणि दिशादर्शक फलक नसल्याने निलंगा तालुक्यातील निटूर येथे बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मुगावमार्गे निटूरच्या दिशेने बुधवारी रात्री दुचाकी (एमएच २४, बीजे २८१०)वरुन दोघेजण निघाले होते. ते निटूरनजीक आले असता दुचाकीस्वाराला महामार्गावरील रस्ता दुभाजकाचा अंदाज आला नाही. तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघात झाला. यात सचिन बंडगर (३५, रा. शिरुर धनेगाव) व अन्य एकजण दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना निटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे यांनी प्रथमोपचार करुन त्यांना लातूरला पाठवले.
गावकऱ्यांनी अडवली वाहने... महामार्गाचे काम करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकांना सातत्याने सांगूनही महामार्गावर दिशादर्शक फलक बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कंपनीची वाहने अडवून संताप व्यक्त केला.