पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By हणमंत गायकवाड | Published: July 27, 2022 05:49 PM2022-07-27T17:49:39+5:302022-07-27T17:50:29+5:30
आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लातूर : नाईट पेट्रोलिंग दरम्यान दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सात दुचाकींसह ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहमदपूर पोलिसांनी २२ जुलैच्या मध्यरात्री नाईट पेट्रोलिंगदरम्यान ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
लातूर रोडवरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी २२ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती दुचाकी ढकलत जात होता. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो भांबावून गेला. त्याला दुचाकीसह पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याचे नाव सुनील बाबुराव धोत्रे (रा. दवणहिप्परगा, ता. देवणी) असल्याचे समजले. त्याने दुचाकी लातूर येथील कृपासदन इंग्लिश स्कूलसमोरून चोरल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर अहमदपूर, उदगीर, गांधी चौक तसेच विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तसेच कर्नाटकमधून विविध ठिकाणाहून दुचाकींची चोरी केल्याचे सांगितले.
यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत ३ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चितांबर कामटेवाड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. विठ्ठल दुरपडे, रामचंद्र केदार, पोलीस अंमलदार सुहास बेंबडे, कैलास चौधरी, परमेश्वर वागतकर, नारायण बेंबडे, फहिम शेख, शेंडगे आदींनी ही कारवाई केली.
गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता...
आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, सतर्क पेट्रोलिंग केल्याने सराईत दुचाकी चोराला जेरबंद करणे शक्य झाले आहे.