देवणी बाजार समिती निवडणुकीत दोन महिला बिनविरोध; छाननीत १९ अर्ज ठरले अवैध
By हरी मोकाशे | Published: April 5, 2023 06:51 PM2023-04-05T18:51:19+5:302023-04-05T18:51:43+5:30
बाजार समितीत महिलांसाठी दोन जागा आहेत. त्यासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल होते. छाननीत ४ अर्ज नामंजूर झाले.
देवणी : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी एकूण ८५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. त्यात १९ अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, दोन महिलांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
देवणी बाजार समितीच्या सोसायटी गटातील ११ जागांसाठी ५१ अर्ज आले होते. त्यापैकी १२ अर्ज छाननीत अवैध ठरले. ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी २२ अर्ज होते. त्यापैकी ६ नामंजूर झाले. व्यापारी गटातील दोन जागांसाठी ८ अर्ज होते. हे सर्व अर्ज छाननीत मंजूर झाले. हमाल- मापाडी गटातील एका जागेसाठी चार अर्ज आले होते. त्यापैकी एक अर्ज अवैध ठरला आहे.
बाजार समितीत महिलांसाठी दोन जागा आहेत. त्यासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल होते. छाननीत ४ अर्ज नामंजूर झाले. त्यामुळे कौशल्याबाई गुणवंत सावंत व रेखाताई बालाजी भोसले यांचे दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या दोन महिलांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
या निवडणुकीत सोसायटी गटातील पांडुरंग पटवारी, सूर्यकांत चिंचोले, सतीश पाटे, संदीप हुचनाळे, शंकर पाटील, शिवाजीराव देवणे, राजश्री सूर्यवंशी, कमलाबाई रामसने, सुकुमारबाई भोसले, शोभाताई बिरादार, संदीपान पेठे, सूर्यकांत भोसले, भागवत भातांब्रे, ग्रामपंचायत गटातील प्रमोद पाटील, अंकुश माने, माधव पाटील, भिवसेन बिरादार, सय्यद शायदा, हमाल- मापाडी गटातील अंकुश सूर्यवंशी यांचा अर्ज छाननीत अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुलकर्णी, सहाय्यक अधिकारी एस. एल. अहिंनवाड यांनी दिली.