पुरात अडकलेल्या दोघा युवकांची २० तासांनी सुखरुप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 03:17 PM2022-10-22T15:17:51+5:302022-10-22T15:18:27+5:30
गावाकडे जाताना तेरणा- मांजराच्या संगमावर अडकले तरुण होते.
-बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) : गावाकडे जात असलेले देवणीचे दोन युवक निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा- मांजरा नदीच्या संगमावर पुराच्या पाण्यात शुक्रवारी दुपारी अडकले होते. त्यांची आपत्ती व्यवस्थानच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करीत शनिवारी सकाळी सुटका केली. तब्बल २० तासानंतर हे युवक सुखरुप बाहेर पडले.
देवणी तालुक्यातील विळेगाव व देवणी (खु.) येथील शेतकरी राहुल गवळी (३०) व ट्रक्टर चालक महेश गिरी (३२) हे दाेघे शुक्रवारी दुपारी २ वा. च्या सुमारास औराद शहाजानी येथील पेरणी यंञ दुरुस्तीस देऊन गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, तेरणा व मांजरा प्रकल्पाचे नद्यांमध्ये अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे येथील तेरणा, मांजरा नद्यांच्या संगमावर पुराच्या पाण्याने नदी पात्र बदलून शेकडो एकरवरील शेतात पाणी पसरले आहे. तसेच तेरणाचा बॅक वॉटर पसरल्याने औराद- वांजरखेडा, हालसी- तुगावसह आदी अन्य लहान पूल पाण्याखाली गेले.
दरम्यान, हे दोन्ही तरुण गावाकडे जाण्याच्या गडबडीत पाण्यातून रस्ता काढत होते. तेव्हा त्यांना स्थानिक शेतकरी शिवपुत्र आग्रे यांनी पुढे जाऊ नका. पुढील पुलावर पाणी आल्याचे सांगितले. मात्र, ते ट्रॅक्टर घेऊन पुढे गेले आणि दाेघे पाण्यात अडकले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सूचनेवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी निलंग्यातील शोध व बचाव पथकास घटनास्थळी पाचारण केले.
या पथकामार्फत त्या दोन्ही युवकांची आणि त्यांच्यासोबत असलेला एका श्वानाची रेस्क्यू बोटच्या मदतीने शनिवारी सकाळी सुखरूपपणे सुटका करण्यात आली. पथकाचे नेतृत्व निलंग्याचे अग्निशमन अधिकारी गंगाधर खरोडे यांच्याबरोबर विशाल सांडू, साेमनाथ मादळे, सचिन कांबळे यांनी केले. त्यासाठी औराद ठाण्याचे सपाेनि. संदीप कामत, तलाठी बालाजी भाेसले, विशाल केंचे, पाेलीस कर्मचारी श्रीनिवास चिटबाेणे, धनराज हरणे, मारुती कच्छवे, रविंद्र काळे, लतिफ साैदागर आदींचे सहकार्य लाभले.
दोघांनी काढली रात्र जागून...
पुराच्या पाण्यात अडकलेले राहुल व महेश यांनी घराकडे फोन करुन पाऊस सुरु असल्याने आम्ही घरी उद्या येतो, असा निरोप दिला. रात्री शेतकऱ्याच्या गोठ्यातील लोखंडी पलंग ट्रॅक्टरमधील ट्रॉलीत टाकून रात्र जागून काढली. २० तास उपाशी होते. आपत्ती व्यवस्थापनने त्यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना चहा- बिस्किट दिले.
सध्या मांजरा, तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले. २२१०एलएचपी औराद शहाजानी : औराद शहाजानी येथील तेरणा- मांजराच्या संगमावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोघांसह श्वानाची शनिवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने सुखरुप सुटका केली.