उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !
By संदीप शिंदे | Published: February 3, 2024 05:28 PM2024-02-03T17:28:35+5:302024-02-03T18:21:10+5:30
मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते.
उदगीर : येथील उदगीर-अहमदपूर रस्त्यावर मागील एका महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचे बळी गेले आहेत. सातत्याने अपघात होत असलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर अनेक ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. त्याठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उदगीर शहराचा भौतिक विकास झपाट्याने होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्यामध्ये रस्ते बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही भागातील रस्ते पूर्ण झालेले आहेत तर काही रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उदगीर-अहमदपूर हा शहराच्या दृष्टीने वाहतुकीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. लोणी मोड, हाकनकवाडी, तोंडार पाटी, गंडी पाटी, मन्ना उमरगा, इस्मालपूर, एकुर्गा दरम्यान रस्ता हा अतिशय नागमोडी पद्धतीने असल्याने अनेक वाहनचालक त्यांचे वाहन चालवताना गडबडून जातात. त्यामुळे दररोज एखादा तरी अपघात या रस्त्यावर होतो.
मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर कुठलेही सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे उदगीर ते इस्मालपूर दरम्यान मागील एका महिन्यात ९ जणांचा बळी गेल्याची नोंद शासन दप्तरी आहे. हे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठिकठिकाणी गतिरोधक उभे करण्याची गरज आहे. मात्र, फलक नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. एका महिन्यात नऊ जणांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला असून, यातील बहुतांश जण हे दुचाकीवर होते. फलक असते तर अपघात रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ठेकेदारास फलक लावण्याच्या सूचना...
पोलिस प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरूनच मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवता येऊ शकतो. मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. उदगीर-अहमदपूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दिशादर्शक बसवण्याचे सूचना देण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...
ग्रामीण भागातून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज असतानासुद्धा याठिकाणी फलक लावलेले नाहीत. पुढे गाव आहे, पुढे वळण रस्ता आहे, अपघात प्रवण रस्ता, वाहने सावकाश चालवा, पुढे अरुंद पूल आहे, वेग मर्यादा सांभाळा असा कुठलाही सूचनाफलक या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.