उदगीरमध्ये शेतकरी, मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 07:14 PM2018-07-12T19:14:53+5:302018-07-12T19:17:32+5:30
शेतकरी, स्थानिक मच्छिमारांचे विविध प्रश्न सोडवावेत, अशा मागण्यांसाठी उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे शिवसेनेच्या वतीने आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
उदगीर (लातूर ) : शेतकरी, स्थानिक मच्छिमारांचे विविध प्रश्न सोडवावेत, अशा मागण्यांसाठी उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे शिवसेनेच्या वतीने आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
पीकविमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यात यावा़ वाढवणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेवर प्रशासक नेमणूक करावी तसेच संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी़ स्थानिक मच्छिमारांना व्यावसायिक परवाने द्यावेत, हाळी हंडरगुळी येथील अवैध धंदे बंद करावेत, नांदेड- बीदर राज्यमार्गालगतच्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, उपजिल्हा प्रमुख रामचंद्र अदावळे, उपजिल्हा प्रमुख बालू रेड्डी, तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल, युवा सेना उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण पेटकर, श्रीनिवास नरहरे, भानुदास कबनुरे, युवा सेना तालुका प्रमुख रमण माने यांच्यासह उपेंद्र काळेगोरे, कृष्णा सुकणे, शशिकांत तेलंग, भैय्या शिंदे, नामदेव जाधव, दत्ता माने, नितीन मोरतळे, अर्जून आटोळकर, लखन घोणसे, मयुर डापडवाड यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
दोन तास वाहतूक ठप्प़़
हे आंदोलन नांदेड- बिदर राज्यमार्गावरील हाळी हंडरगुळी येथे करण्यात आले़ आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती़ त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ आंदोलन झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले़