कार-टेम्पाेच्या अपघातात उदगीरच्या दाेन व्यापाऱ्यांचा मृत्यू, तीन गंभीर
By राजकुमार जोंधळे | Published: November 7, 2022 07:18 PM2022-11-07T19:18:11+5:302022-11-07T19:18:30+5:30
लातूर-नांदेड महामार्गावरील भातांगळी पाटीनजीक झाला अपघात
लातूर / उदगीर : मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या कार आणि भरधाव टेम्पाेचा भीषण अपघात झाला. यामध्ये उदगीर येथील दाेन व्यापारी जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लातूर-नांदेड महामार्गावरील भातांगळी पाटीनजीक घडली. घटनास्थळी लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या पाेलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. व्यापारी राजकुमार उर्फ तानाजी कुमदाळे आणि प्रशांत हनुमंतराव कोलबुद्धे असे मृत व्यापाऱ्यांची नावे आहेत.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर येथील काही जण मुलगी पाहण्यासाठी कारने साेमवारी सकाळी लातूरच्या दिशेने निघाले हाेते. त्यांची कार लातूर -नांदेड महामार्गावरील ममदापूर पाटी ते भातांगळी पाटी दरम्यान आली. यावेळी लातूरकडून नांदेडच्या दिशेने भरधाव निघालेल्या टेम्पाे (एम.एच. ४९ एल. ४३७७) आणि कारची (एम.एच. १३ सी.एस. ९९५५) समाेरासमाेर जाेरदार धडक झाली. या भीषण अपघातात उदगीरच्या मार्केट यार्डातील व्यापारी राजकुमार उर्फ तानाजी कुमदाळे (वय ५०) आणि प्रशांत हनुमंतराव काेलबुद्धे (वय १९) हे जागीच ठार झाले. तर कारमधील प्रदीप हनुमंत काेलबुद्धे (वय २५ रा. जानवळ ह.मु. ता. उदगीर), गणेश पेटे (वय २५ रा. पेटेवाडी ता. उदगीर, जि. लातूर), मंगेश माेमले (वय ३५ रा. जांभळवाडी) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारसाठी लातूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी लातूर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देवून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. याबाबबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती पाेलीस निरीक्षक गणेश कदम यांनी दिली.