युडीआयडी कार्डवरील 'कोटी'व्या क्रमांकाने कुटुंबियांची विमानाने दिल्ली वारी!

By हरी मोकाशे | Published: December 11, 2023 06:50 PM2023-12-11T18:50:55+5:302023-12-11T18:51:41+5:30

युडीआयडी कार्डमुळे हाळीच्या वंशिकाचा गौरव

UDID card's 'millionth' number reason behind families plane travel to Delhi! | युडीआयडी कार्डवरील 'कोटी'व्या क्रमांकाने कुटुंबियांची विमानाने दिल्ली वारी!

युडीआयडी कार्डवरील 'कोटी'व्या क्रमांकाने कुटुंबियांची विमानाने दिल्ली वारी!

लातूर : युडीआयडी कार्डमध्ये १ कोटीवा क्रमांक मिळाल्याने जिल्ह्यातील हाळी येथील दोन वर्षीय वंशिका माने हिचा दिल्लीत सोमवारी गौरव झाला. तिथे पोहोचण्यासाठी शासनाच्या वतीने तिच्यासह पालकांच्या प्रवासाची विमानाने सोय करण्यात आली होती. अंध मुलीमुळे कुटुंबियांची हवाई सफरने दिल्ली वारी झाली आहे. त्यामुळे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गतच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाअंतर्गत देशातील दिव्यांगांना सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून युडीआयडी कार्ड देण्यात येते. देशात आतापर्यंत १ कोटी युडीआयडी कार्डचे वितरण झाले आहे. १ कोटीवा क्रमांक जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी येथील दोन वर्षीय अंध वंशिका नंदकिशोर माने हिला मिळाला. त्याबद्दल तिचा सोमवारी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे गौरव करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार...
हाळीच्या वंशिका माने या मुलीचा दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक, विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. यावेळी वंशिकासोबत तिची आई मनीषा माने आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच लातूर जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. सीईओंच्या वतीने समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी हा सत्कार स्विकारला.

दोनच मुली, त्याही अंध...
उदगीर तालुक्यातील हाळी येथील नंदकिशोर माने हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीवर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कुटुुंबात पत्नी अन् दोन मुली आहेत. या दोन्ही मुली अंध आहेत. शेती, मजुरी करुन मुलींचे शिक्षण करीत असल्याचे वंशिकाची आई मनीषा माने यांनी सांगितले.

विमान प्रवास स्वप्नगतच...
आम्हाला दोन मुली असून त्या अंध आहेत. छोटी मुलगी वंशिकाचा दिल्लीत सत्कार होणार असल्याचे समजले आणि आनंदाचा धक्काच बसला. विमानाने प्रवास करावा लागणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर ते स्वप्नगतच वाटत होते. वंशिकामुळे हवाई सफर होण्याबरोबरच दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव झाला. खरोखरच बेटी ही धनच असते. तिच्यामुळेच आमचा सन्मान झाला.
-मनीषा माने, आई.

Web Title: UDID card's 'millionth' number reason behind families plane travel to Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर