उजनी ग्रामपंचायतीत अखेर दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:02 AM2021-01-08T05:02:52+5:302021-01-08T05:02:52+5:30

उजनी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गणल्या जाणाऱ्या औसा तालुक्यातील उजनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी कंबर कसल्याने बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र ...

Ujani Gram Panchayat is finally fighting | उजनी ग्रामपंचायतीत अखेर दुरंगी लढत

उजनी ग्रामपंचायतीत अखेर दुरंगी लढत

googlenewsNext

उजनी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गणल्या जाणाऱ्या औसा तालुक्यातील उजनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी कंबर कसल्याने बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने अखेर दुरंगी लढत होत आहे. १५ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

औसा तालुक्यातील उजनी येथील ग्रामपंचायत ही १५ सदस्यांची आहे. तुळजापूर- औसा महामार्गावर व मोठी बाजारपेठ असल्याने या गावातील ग्रामपंचायतीस विशेष महत्त्व आहे. त्यातच राजकीयदृष्ट्या ही ग्रामपंचायत महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीसाठी माजी सरपंच योगिराज पाटील व शिवछत्रपती प्रतिष्ठाणचे प्रवीण कोपरकर यांच्या पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे. १५ रोजी मतदान होणार असल्याने प्रचारासाठी कमी कालावधी आहे. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे.

२००१ ते २०१५ पर्यंत ग्रामपंचायत माजी सरपंच योगिराज पाटील यांच्या ताब्यात होती. मात्र, २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत योगिराज पाटील यांचा पराभव करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे व शिवछत्रपती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रवीण कोपरकर एकत्रित आले. त्यांनी पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, मागील जिल्हा परिषद निवडणुकीत नारायण लोखंडेविरुद्ध प्रवीण कोपरकर लढत झाली होती. परंतु, सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोपरकर आणि लोखंडे यांनी दिलजमाई करुन योगिराज पाटील यांच्या पॅनलवर पुन्हा बाजी मारण्याचा डाव आखला आहे. त्यासाठीच नारायण लोखंडे यांचे बंधू माजी उपसरपंच धनराज लोखंडे यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

भाजपाच्या रंदवे अपक्ष...

उजनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा विजयमाला रंदवे या प्रभाग ४ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तसेच अन्य सात अपक्ष आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे अपक्ष कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे आजघडीला सांगणे कठीण असले तरी लवकरच ते समजणार आहे.

जोरदार प्रचार सुरू...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. गावातील स्थानिक प्रश्न सोडविण्याचे दोन्ही पॅनलकडून आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस चुरस वाढत असल्याने ही निवडणूक रंगतदार होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Web Title: Ujani Gram Panchayat is finally fighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.