उमरग्याच्या इरण्णाचे दिल्ली कनेक्शन उघड! लातुरातील दाेन शिक्षक आणि मध्यस्थाची भूमिका...

By राजकुमार जोंधळे | Published: June 24, 2024 09:56 PM2024-06-24T21:56:28+5:302024-06-24T21:57:44+5:30

इरण्णाच्या संपर्कात लातुरातील जि. प.चे दाेन शिक्षक हाेते.

umarga iranna delhi connection revealed and role in neet exam paper leak case | उमरग्याच्या इरण्णाचे दिल्ली कनेक्शन उघड! लातुरातील दाेन शिक्षक आणि मध्यस्थाची भूमिका...

उमरग्याच्या इरण्णाचे दिल्ली कनेक्शन उघड! लातुरातील दाेन शिक्षक आणि मध्यस्थाची भूमिका...

राजकुमार जाेंधळे, लातूर, धाराशिव : नीट प्रकरणात लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या चाैघांपैकी एकजण उमरगा (जि. धाराशिव) येथील आयटीआयमध्ये नाेकरीला असून, ताे मूळचा नांदेड जिल्ह्यातील देगलूरचा आहे. त्याचे दिल्ली कनेक्शन समाेर आले आहे. इरण्णा दिल्लीतील गंगाधरच्या संपर्कात हाेता, तर इरण्णाच्या संपर्कात लातुरातील जि. प.चे दाेन शिक्षक हाेते.

नीटमध्ये गुणवाढ करून देण्याच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा मष्णाजी कोनगलवार हा लातुरातील दोघा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागून घेत होता. दरम्यान, हे प्रवेशपत्र ताे दिल्लीतील गंगाधर याच्याकडे पाठवीत हाेता. शिक्षक संजय तुकाराम जाधव आणि अटकेतील जलीलखाँ पठाण (दाेघेही रा. लातूर) हे कधीपासून इरण्णाच्या संपर्कात आहेत व त्यांच्यात नेमका संवाद कसा चालायचा या दृष्टीने पाेलिस तपास करीत आहेत.

पेपरफुटीचे प्रकरण की गुणवाढीची भानगड...

दाेन्ही जिल्हा परिषद शिक्षक आणि आयटीआयतील कर्मचारी हे तिघेही दिल्लीच्या गंगाधरच्या संपर्कात राहून इथल्या हालचाली करीत हाेते. त्यात गंगाधर हाच सूत्रधार आहे की त्याच्याही पुढे आणखी एखादी व्यवस्था आहे. याचा उलगडा गंगाधर हाती लागल्यानंतरच हाेईल. विशेष म्हणजे देशभर सुरू असलेल्या पेपरफुटी प्रकरणापेक्षा लातूर-धाराशिव ते दिल्ली प्रकरण वेगळे असल्याचा अंदाज तपास अधिकाऱ्यांचा आहे. इथे प्रश्नपत्रिका फाेडल्या किंवा पुरविल्या असे काही अजून तरी आढळून आलेले नाही. मात्र, गंगाधर पुढे काेणाशी काय बाेलून व कशी देवाण-घेवाण करीत हाेता आणि गुणवाढीची हमी काेणत्या टप्प्यावर दिली जात हाेती, हे पुढील काही दिवसात समजेल.

आणखी दोघांना उचलले; चौकशी सुरू !

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये चौकशी करीत असताना आणखी दोघांची नावे समोर आली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही आरोपी दोन शिक्षकांचे सबएजंट म्हणून काम करीत असल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पेपरफुटी प्रकरणात आरोपी जलीलखाँ पठाण, संजय जाधव, इरण्णा कोनगलवार व दिल्लीचा गंगाधर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यातील पठाण पोलिस कोठडीत असून, संजय जाधव ताब्यात आहे. इरण्णा व दिल्लीच्या गंगाधरचा शोध सुरू आहे. तर लातुरातील दोन्ही शिक्षकांच्या संपर्कात असलेले आणखी दोघेजण ताब्यात घेतले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले. यापूर्वी चार जणांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, एक ताब्यात आहे. दोघांचा शोध सुरू आहे. नव्याने दोघांना उचलले आहे. असे एकूण सहा जणांचा संबंध या प्रकरणाशी जोडला गेला आहे.

Web Title: umarga iranna delhi connection revealed and role in neet exam paper leak case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.