धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी

By हरी मोकाशे | Published: June 19, 2024 08:29 PM2024-06-19T20:29:33+5:302024-06-19T20:29:58+5:30

नैराश्यातून उचलले पाऊल : मायलेकीचा मृत्यू

Unable to admission in CBSE school, mother jumps into well with daughter incidence in latur | धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी

धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी

लातूर : आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीच्या कमरेला धरुन विहिरीत उडी मारली. त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव (क.) येथे घडली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भाग्यश्री व्यंकट हालसे (२६) व समिक्षा व्यंकट हालसे (५, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असे मयत मायलेकीचे नाव आहे. माळेगाव (क.) येथील व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा आहेत. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करीत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान, आपली दोन्ही लेकरं सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना सीबीएसई शाळेत पाठवू असे म्हणत होत्या. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत असत. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घरातील मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर पडल्या. त्यांनी गावाजवळील शेतकरी केदार पाटील यांची विहीर गाठली आणि पतीला फोन करुन आपल्या दीदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली.

पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. बुधवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे वडील अरुण बोडके (रा. धनगरवाडी, ता. देवणी) यांच्या माहितीवरुन औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत.

खेळण्यासाठी निसटला अन् जीव बचावला...
भाग्यश्री हालसे ह्या नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी मुलीला घेऊन विहिरीकडे जात असताना रस्त्यात मुलगा समर्थ खेळत असताना दिसला. त्यामुळे आईने त्याच्याही हाताला धरून चल माझ्यासोबत असे म्हणत घेऊन चालल्या होत्या. तेव्हा खेळण्यासाठी तो आईच्या हातून निसटून पळाला. त्यामुळे तो बचावल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

पप्पा, आईसोबत आले...
भाग्यश्री ह्या मुलीसह गावाजवळील विहिरीजवळ पोहोचल्यानंतर पतीस व्हिडिओ कॉल केला. परंतु, इंटरनेट बंद असल्याने समजले नाही. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि आईसोबत आले पप्पा असे मुलगी म्हणाली. ते शेवटचेच बोलणे झाल्याचे वडील व्यंकट यांनी सांगितले.

आईची सतत आठवण...
भाग्यश्री यांच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तेव्हापासून त्या सतत रडत बसत असत. नेहमी त्यांना आईची आठवण होत असे. त्यामुळेही त्यांना नैराश्य आले होते, असे पती व भाग्यश्री यांचा भाऊ बालाजी बोडके यांनी सांगितले.
 

Web Title: Unable to admission in CBSE school, mother jumps into well with daughter incidence in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.