लातूरच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत कनेक्शन; ५ एमएलडी पाण्याचे होतेय नुकसान

By हणमंत गायकवाड | Published: April 2, 2024 11:14 AM2024-04-02T11:14:00+5:302024-04-02T11:15:01+5:30

मुख्य जलवाहिनीवर मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाचा पहारा

Unauthorized connection to main water channel of Latur; 5 mld of water loss | लातूरच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत कनेक्शन; ५ एमएलडी पाण्याचे होतेय नुकसान

लातूरच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत कनेक्शन; ५ एमएलडी पाण्याचे होतेय नुकसान

लातूर : धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावरून लातूर शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाइपलाइन करण्यात आली आहे. मात्र या मुख्य जलवाहिनीवर ठिकठिकाणी अनधिकृत कनेक्शन घेतले आहेत. यामुळे दररोज चार ते पाच एमएलडी पाण्याचा तोटा होतो. ही बाब महानगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर लातूर ते रांजणीपर्यंत पाहणी केली असता २५ ठिकाणी मुख्य जलवाहिनी फोडून पाणी घेण्यात आल्याचे निदर्शनास आहे. दरम्यान, मनपा आणि जिल्हा प्रशासनाने सर्व कनेक्शन तोडले असून होणारी गळती थांबविली आहे.

धनेगाव येथील मांजरा प्रकल्प ते लातूर अशी ६५ किलोमीटर अंतराची मुख्य जलवाहिनी आहे. फक्त लातूर शहरासाठी या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हरंगुळ येथे जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर वितरण  जलकुंभनिहाय केले जाते. मात्र या मुख्य जलवाहिनीवर वाटेत ठिकठिकाणी अनेकांनी व्हाॅल्व्हवरून कनेक्शन घेतलेले आहे. यामुळे दररोज चार ते पाचएमएलडी पाणी लातूरला येणारे वाटेतच वेस्ट होत होत होते. ही बाब मनपाच्या लक्षात आल्यानंतर मुख्य जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. लातूर ते रांजणी गावापर्यंत २५ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.

लातूरसाठी असणाऱ्या १५ टक्के पाण्याचे नुकसान.....
भुई समुद्रगा, जोड जवळा, काटगाव तांडा, वांजरखेडा पाटी, गादवड, तांदूळजा आणि रांजणी येथे मांजरा प्रकल्पावरून  आलेल्या या मुख्य जलवाहिनीवर जवळपास २५ अनधिकृत कनेक्शन घेतलेले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. लातूरला येणाऱ्या एकूण पाण्यापैकी १५ टक्के नुकसान यातून होते. हे नुकसान या कारवाईमुळे टळले आहे.

मुख्य जलवाहिनीवर मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाचा पहारा
धनेगाव मांजरा प्रकल्प ते लातूर या ६५ किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीवर पुन्हा कोणी अनधिकृत कनेक्शन घेऊन पाण्याचा गैरवापर करू नये म्हणून २४ तास पथकाचा पहारा राहणार आहे. धनेगाव ते लातूर जलवाहिनी मार्गावर सतत फिरते पथक राहणार आहे. त्यामुळे पुन्हा कोणी कनेक्शन घेऊ नये, अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असेही महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

लातूर ते रांजणीपर्यंत कारवाई
उपजिल्हाधिकारी रोहिणी नरहे, तहसीलदार सौदागर तांदळे, महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण लातूर शहर पाणीपुरवठा विभागाचे वितरण प्रमुख जलील शेख यांच्या उपस्थितीत लातूर ते रांजणीपर्यंत मुख्य जलवाहिनीवर असलेले कनेक्शन तोडण्यात आले. उद्या धनेगावपर्यंत पडताळणी होणार आहे.

Web Title: Unauthorized connection to main water channel of Latur; 5 mld of water loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.