दादा, बाळ तापीनं फणफणतयं, कुठं दाखवायचं? मीही तेच शोधतोय ताई...
By हरी मोकाशे | Published: February 21, 2023 07:30 PM2023-02-21T19:30:30+5:302023-02-21T19:31:54+5:30
बाह्यरुग्ण विभागाचे सुपरस्पेशालिटीत स्थानांतर झाल्याने धांदल
लातूर : दादा, बाळ तापीनं फणफणतयं, डॉक्टरं कुठं बसत्यात की? या नव्या दवाखान्यात काहीच समजना झालयं. मुलांचं डॉक्टरं कुठं असत्यात ते दाखवता का दादा, असे एका महिलेने म्हटले. तेव्हा आपल्या मुलाला उपचारासाठी घेऊन आलेला व्यक्ती म्हणाला, ताई मीही तेच शोधताेय. जरा इथ- तिथं इचारावं लागेल. कारण ही इमारत नवी हाय नी... असा प्रति प्रश्नवजा सल्ला त्यांनी मंगळवारी दिला.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची बाह्यरुग्ण विभागाची इमारत वापरासाठी अयोग्य झाल्याने ती पाडून तिथे नवीन सहा मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग सुपरस्पेशालिटी (अतिविशेषोपचार) हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आला आहे. मंगळवारपासून सुपरस्पेशालिटीमधून बाह्यरुग्ण सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईकही गडबडल्याचे पहावयास मिळाले. उपचारासाठी आलेल्या प्रत्येकजण एकमेकांकडे, तेथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करीत होते.
अंध व्यक्तीलाही सापडत होते पूर्वीचे विभाग...सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीची इमारत ही टोलेजंग आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण विभाग हा एक मजली होता. त्यामुळे विभाग एकमेकांना लागून होते. नेहमी उपचारासाठी येणारे अगदी डोळे झाकूनही संबंधित विभागाकडे जात असत. एवढेच नव्हे तर अंध व्यक्तीही विना चाचपडत आपल्याला अपेक्षित असलेल्या विभागापर्यंत पोहोचत असतं, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
समाजसेवी कार्यकर्त्यांची मदत...
बाह्यरुग्ण विभाग सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरु झाल्याने येथे आलेल्या रुग्णांची तसेच नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही ठिकाणी समाजसेवी कार्यकर्ते थांबविले होते. कुठल्याही रुग्णांनी चौकशी केल्यानंतर ते तात्काळ संबंधित विभागापर्यंत पोहोचवित होते. त्यामुळे होणारी धांदल काही प्रमाणात कमी झाली होती.
रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर...
३०- ३५ वर्षे सतत एकाच इमारतीत ये- जा असल्यामुळे बहुतांश रुग्ण, नातेवाईकांना कुठला विभाग कुठे आहे, याची माहिती होती. आता सुपरस्पेशालिटीमध्ये दोन- चार दिवस धांदल उडणे अपेक्षित आहे. मात्र, रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आवश्यक ती दक्षता घेत आहोत. रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी आवश्यक ती मदत करतील.
- डॉ. उदय मोहिते, विभागप्रमुख, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र.
वातानुकुलित सुविधा...
सुपरस्पेशालिटीमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरु असून आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच वातानुकुलित सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.