औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून गुढ आवाज; भूकंप नसल्याचा प्रशासनाचा दावा
By संदीप शिंदे | Updated: March 27, 2024 13:25 IST2024-03-27T13:25:05+5:302024-03-27T13:25:26+5:30
नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे

औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून गुढ आवाज; भूकंप नसल्याचा प्रशासनाचा दावा
औराद शहाजानी : मागील आठवड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचा सौम्य धक्का लातूर जिल्ह्यातील काही भागात जाणवला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी ११:५० वाजता औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून आवाज आला असून, नागरिकांत भीतीचे वातावरण होते. मात्र, या आवाजाची भूकंपमापक यंत्रावर काेणतीही नोंद झालेली नसून, उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने बाष्पीभवन दर वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी घटल्याने भूर्गभातून आवाज आला असेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचे सौम्य पडसाद लातूर शहरासह देवणी, उदगीर, निलंगा, औराद शहाजानी परिसरात जाणवले होते. दरम्यान, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनीसह परिसरातील अनेक गावांमध्ये बुधवारी सकाळी ११:५० वाजता अचानक भूगर्भातून एक मोठा आवाज झाला. हा आवाज औराद शहाजानी शहरासह परिसरातील तगरखेडा, हलगरा, सावरी गावामध्ये ऐकू आला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत लातूर येथील भूकंप केंद्र प्रमुख आर.ए. साेळुंके म्हणाले, सदर आवाजाची भुकंपमापक केंद्रावर नाेंद नाही. उन्हाची तीव्रता वाढलेली असून, बाष्पीभवन दर अधिक आहे. जमिनीतील पाणी पातळी घटलेली असल्याने भूगर्भात दरी निर्माण हाेऊन आवाज हाेऊ शकताे. तर निलंगा तहसिलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले, सदर आवाज जमिनीतून झालेला असु शकतो. भुकंपाची कोणतीही नोंद नाही. जनतेने घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.