शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार नाही; कापड पुरवठा नसल्याने नियोजन कोलमडले!
By संदीप शिंदे | Published: June 12, 2024 12:41 PM2024-06-12T12:41:10+5:302024-06-12T12:42:02+5:30
लातूर जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या वर्गातील ९६ हजार ९५२ लाभार्थी
लातूर : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांना मिळतो. यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी गणवेश वितरण होत असते. मात्र, जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाला गणवेशाचे कापड उपलब्ध झालेले नाही. परिणामी, गणवेश वितरणाचे नियोजन कोलमडले आहे.
२०२३-२४ पासून समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना प्रत्येकी दोन गणवेश संचांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी यंदापासून एक नियमित गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून पुरविण्यात येणार आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप संबंधित एजन्सीकडून कापडच उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके मिळणार असून, गणवेशासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यात इयत्तानिहाय असलेले लाभार्थी...
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. यामध्ये पहिलीचे १५ हजार ५८६, दुसरीचे १५५६६, तिसरीचे १७२८१, चौथीचे १५४७८, पाचवीचे १०८६२, सहावीचे ९६३०, सातवीचे ९४२३ आणि आठवीचे ३ हजार २६ लाभार्थी आहेत. यामध्ये अहमदपूर, औसा, चाकूर, देवणी, जळकोट, लातूर, निलंगा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर आदी तालुक्यांचा समावेश असून, कापड वितरणावर आता गणवेश वाटपाचे नियोजन अवलंबून आहे.
पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील १० पंचायत समिती स्तरावरून मिळालेल्या मागणीनुसार, प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे मागणी नोंदवली होती. आता पुस्तके तालुकास्तरावर दाखल झाली असून, शाळांकडे पोहोच केली जात आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार नाही...
दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि गणवेशाचे वितरण करण्यात येत असते. यंदा पुस्तके शाळांपर्यंत पोहाेचली आहेत. मात्र, गणवेशाचे कापड अद्याप महिला आर्थिक विकास महामंडळाला मिळालेले नाही. परिणामी, कापड प्राप्त झाल्यावर त्याचे बचत गटांना वितरण होईल. त्यानंतर ते शिवण्यास बराचसा कालावधी लागणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
शालेय गणवेशाचा असा राहणार रंग...
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट राहील. तसेच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता हाफ पॅन्ट, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फुल पॅन्टसाठी गडद निळ्या रंगाचे कापड राहील. पहिली ते पाचवीच्या मुलींसाठी निळ्या रंगाचे कापड देण्यात येणार असून, सहावी आणि आठवीच्या विद्यार्थिनींकरिता आकाशी निळ्या रंगाचे कापड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.